सिंहगडावरील कचरा प्रकल्प यंत्रसामग्री चोरीप्रकरणी सहा जण ताब्यात

सिंहगडावरील कचरा प्रकल्प यंत्रसामग्री चोरीप्रकरणी सहा जण ताब्यात
Published on
Updated on

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ सिंहगड अभियानांतर्गत किल्ल्यावरील वाहनतळावर वन विभागाने पर्यावरणपूरक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातील साडेसात लाख रुपये किंमतीच्या आधुनिक मशिनरींसह इतर साहित्य गेल्या डिसेंबर महिन्यात चोरीला गेले आहे. याप्रकरणी हवेली पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी गडावरील एका खाद्यपदार्थ विक्रेत्यासह सहाजणांना अटक केली.

मुख्य सुत्रधार व सिंहगडावरील खाद्यपदार्थ विक्रेता सुनील शिवाजी चव्हाण (वय 23), त्याचे साथीदार आकाश काळुराम चव्हाण (वय 25, दोघे रा. मोरदरी, ता. हवेली), दादा बबन चव्हाण (वय 36, रा. शिंदेवाडी, ता. भोर), शुभम रोहिदास भंडलकर (वय 23), शंभू दत्तात्रय शितकल (वय 22 वर्षे, रा.माहुर, ता. पुरंदर) व सहिमुद्दीन सज्जाद अली साह (वय 30, रा. गुजरवाडी, ता. हवेली), अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (दि.23) पोलिस कोठडी सुनावली आहे.

तीन चोरटे फरार असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. चोरी गेलेले मशिनरी व साहित्य अद्याप हस्तगत करण्यात आले नाही. या मशिनरीची चोरट्यांनी भंगारात अवघ्या पंधरा हजार रुपयांला विक्री केली. त्यासाठी पिकअप टेम्पो भाड्याने घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी सिंहगड वन विभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सहायक पोलिस निरीक्षक निरंजन रणवरे या प्रकरणाचा तपास करत आहे. सिंहगड किल्ल्याच्या डोणजे व कोंढणपूर परिसरातील रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज व आरोपींच्या फोन कॉलच्या आधारे तांत्रिक तपासणीतून पोलिसांना याप्रकरणाचा छडा लावण्यात यश आले.सिंहगडावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या मशिनरीसह साहित्य चोरट्यांनी गेल्या 18 ते 22 डिसेंबरदरम्यान लंपास केले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी याप्रकरणाची दखल घेत संयुक्त तपासाचे आदेश होते. पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, गुन्हे शोध शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शीळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक निरंजन रणवरे, नेताजी गंधारे आदींच्या पथकाने तीन आठवडे तपास करत चोरट्यांचे धागेदोरे मिळवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news