ठाणे

कल्याण डोंबिवलीची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

अनुराधा कोरवी

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा ; कधीकाळी कोरोनाचा राज्यातील हॉटस्पॉट अशी ओळख बनलेल्या कल्याण डोंबिवलीची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हाताच्या बोटावर मोजता इतकेचं कमी कोरोना रुग्ण आढळून येत असताना शुक्रवारी (दि. ४ मार्च २०२२) रोजी कल्याण डोंबिवलीत एकही नवा कोरोना रुग्ण आढळून आला नाही. ही कल्याण डोंबिवलीकरांच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक अशी बाब असून येत्या काळात कल्याण डोंबिवलीतून कोरोनाचे समूळ उच्चाटन होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

१३ मार्च २०२० रोजी आढळला पहिला कोरोना रुग्ण

कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर सर्वप्रथम पुणे, मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्ण आढळून येत होते. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच, १३ मार्च २०२० रोजी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आणि तिथल्या नागरिकांसह प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली.

तोकडी सरकारी आरोग्य व्यवस्थेमुळे मोठे आव्हान

कल्याण डोंबिवली महापालिकेची आरोग्य व्यवस्था आधीच व्हेंटिलेटरवर होती. कोरोना येण्यापूर्वीच्या सामान्य परिस्थितीतही केडीएमसीची आरोग्य यंत्रणा तोकडी पडत होती. या पार्श्वभूमीवर कोरोनासारख्या महामारीचा सामना करायचा तरी कसा? या विवंचनेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन होते.

कोवीडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हजारो कोवीड रुग्ण

इतर ठिकाणांप्रमाणे आतापर्यंत कल्याण डोंबिवलीत कोवीडच्या ३ लाटा आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यापैकी पहिली लाट आणि दुसरी लाट अतिशय भयंकर अशी होती. कोवीडच्या या दोन्ही लाटांमध्ये कल्याण डोंबिवलीत दररोज हजारो रुग्ण आढळून येते होते. एकाच दिवशी आढळून आलेल्या सर्वाधिक रुग्णांमध्ये पहिल्या लाटेमध्ये दररोज ५०० तर दुसऱ्या लाटेमध्ये हाच आकडा तब्बल २ हजारांवर गेला होता. तर तिसऱ्या लाटेत रुग्णवाढ भरमसाठ असूनही कोरोनाची तितकीशी परिणामकारकता दिसून आली नाही, ही जमेची बाजू होती.

खासगी डॉक्टरांच्या 'डॉक्टर आर्मीने' दिली मोलाची साथ

शासनाची आरोग्य यंत्रणा तोकडी पडणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांना मदतीसाठी साद घातली गेली. आणि इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि डोंबिवलीच्या डॉक्टर आर्मीने कठीण परिस्थितीत कल्याण डोंबिवलीकरांना मोलाची साथ दिली.
त्याच्याच जोडीला कल्याण डोंबिवलीमध्ये केडीएमसीने अनेक जम्बो कोवीड सेंटर आणि इतर आवश्यक आरोग्य सुविधा उभारल्या.

ज्यामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटांना केडीएमसीने तेवढ्याच ताकदीने तोंड दिलेले पाहायला मिळाले. केडीएमसीने कोवीड काळात केलेल्या या चांगल्या कामाची दखल केंद्र सरकारकडूनही घेण्यात आली आणि केडीएमसी प्रशासनाला कोवीड इनोव्हेशनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

दररोजचे २ हजार रुग्ण ते रुग्णसंख्या शून्यावर

पहिल्या आणि दुसऱ्या कोवीड लाटेत अनेक नागरिकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. पहिल्या लाटेमध्ये दररोज ५०० पेक्षा अधिक तर दुसऱ्या लाटेमध्ये त्यापेक्षा किती तरी अधिक कोवीड रुग्ण आढळून आले. मात्र, केडीएमसीचे जम्बो कोवीड सेंटर, खासगी डॉक्टरांची डॉक्टर आर्मी आणि गेल्या वर्षीपासून सुरू झालेले कोवीड लसीकरण या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी कोवीड रुग्णसंख्या आढळून येत आहे.

तर पहिला कोरोना रुग्ण सापडल्याला पुढील आठवड्यात २ वर्षे पूर्ण होत असतानाच कल्याण डोंबिवलीत आज आढळून आलेली शून्य रुग्णसंख्या ही खूपच आशादायी आहे. ज्याचे सकारात्मक बदल आणि परिणाम पुढील काळात पाहायला मिळतील अशी आशा व्यक्त केली आहे. ( कोरोना मुक्तीकडे वाटचाल )

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT