कोल्हापूर : शिरदवाड येथे राज्य मार्गावर स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन | पुढारी

कोल्हापूर : शिरदवाड येथे राज्य मार्गावर स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन

अब्दुललाट : पुढारी वृत्तसेवा : शिरदवाड (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीसाठी दिवसा १० तास वीज मिळावी, थकीत वीज बिलापोटी वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी आणि इतर मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणात चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे.

शेतकऱ्यांसाठी राज्यात अनेक ठिकाणी दिवसा वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीत शेतीला पाणी देताना साप चावणे, रानटी प्राण्यांचे हल्ले, श्वापदे यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपले जीव गमवावे लागत आहेत. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही मागणी असून देखील ती मिळत नाही; त्याचप्रमाणे शेतीचे थकीत वीज बिलापोटी वीज कनेक्शन तोडण्याचे सपाटाच लावला जात आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काही दिवसांपासून शेतीला दिवसा १० वीज मिळावे व वीज तोडणी तात्काळ थांबवावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

याचाच एक भाग म्हणून आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी घटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. यामुळे लाट, लाटवाडी, शिरदवाड व शिवनाकवाडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुमतीनाथ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी-शिरदवाड येथील महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मार्गावर चक्का जाम आंदोलन केले.

यावेळी किमान दीड दोन तास येथील वाहतूक ठप्प होती. स्वाभिमानीचे सुमतीनाथ शेट्टी, महावीर गिरमल, पोपट आक्कोळे, शितल कुरणे, राजू नाईक, संजय शेडबाळे, बबलू चावरे, बाळासो खोत, आप्पा पाटील, विजय खोत आदींसह सीमाभागातील शेतकरी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. तर याठिकाणी कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आले होता.

१२ वीच्या विद्यार्थ्यांना मुभा

१२ वी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा काळ आहे. तर दुसरीकडे एसटी वाहक-चालकांचा देखील आंदोलन चालू असल्याने वेळेवर वाहने मिळत नाहीत. यामुळे खासकरून परीक्षार्थी विद्यार्थ्यांची काळजी करत स्वाभिमानीच्या वतीने त्यांना मुभा देत परीक्षा वेळ सोडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

हेही वाचलंत का? 

Back to top button