ठाणे

डोंबिवली: आई आजारी आहे, तिच्याशी बोलायचे आहे, जरा मोबाईल देता का? भावनिक साद घालत भामट्यांनी मोबाईल पळवला

अमृता चौगुले

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : आई खूप आजारी आहे, तिच्याशी बोलायचे आहे, जरा तुमचा मोबाईल देता का, अशी भावनिक साद घालून दोघा भामट्यांनी ठाकुर्ली 90 फुटी रस्त्यावर गुरुवारी (दि.1) पहाटे चारच्या सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका पाणीपुरीवाल्याजवळील मोबाईल लांबविला. माणुसकीच्या भावनेतून दोन जणांना संभाषणासाठी मोबाईल देऊन त्यांनी तो लबाडीने पळवून नेल्याने संतप्त पाणीपुरीवाल्याने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या गणेश चाळीत राहणारा सागरकुमार ओमप्रकाश यादव (वय 21) हा तरूण शेव-पाणी-पुरी विक्रीचा व्यवसाय करतो. सागरकुमार आपल्या भावासह गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास 90 फुटी रस्त्यावर सकाळच्या फिरण्यासाठी आला होता. या रस्त्याला असलेल्या मोहन सृष्टी सोसायटीजवळून जात असताना स्कूटरवरून दोन तरुण आले. त्यांनी सागरकुमारजवळ दुचाकी थांबवली. भयभीत दीनवाणीने सागरकुमार याला माझी आई खूप आजारी आहे, मला तातडीने तिच्याशी बोलायचे आहे, पण आमच्याजवळ मोबाईल नाही म्हणून दोन मिनीट तुमचा मोबाईल देता का, अशी गयावया केली.

माणुसकीच्या भावनेतून सागरकुमार याने तातडीने स्कूटरवरील एकाकडे आपला मोबाईल संभाषणासाठी दिला. स्कूटरस्वाराने स्कूटर रस्त्याच्या बाजूला घेतो आणि मग आईशी बोलतो असे सागरकुमारला सांगून स्कूटर थोडी पुढे नेली. सागरकुमार याला काही कळण्याच्या आता ते दोघेही स्कूटरवार सुसाट पळून गेले. सागरकुमार आणि त्यांच्या भावाने स्कूटरस्वारांचा पाठलाग केला. परंतु ते दोन्ही दिसेनासे झाले.

यानंतर सागरकुमार याने टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दोन अज्ञाताविरूदृ गुन्हा दाखल केला. दरत्‍यान, मोहन सृष्टी भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिस आता त्या दोन्ही भामट्यांचा शोध घेत आहेत. मागील दोन महिन्यांपासून 90 फुटी रस्ता भागातील चोऱ्या वाढल्याने या भागातील रहिवाश्यांसह पादचारी, वाटसरू, प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठाकुर्ली 90 फुटी रस्ता परिसरात मध्यमवर्गीयांची वस्ती झपाट्याने वाढत चालली आहे. या भागात राहणारे रहिवासी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उतरुन पायी घरी जातात. अनेक रहिवासी रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी येतात. पहाटे 4 वाजल्यापासून या रस्त्यावर अनेक जण मॉर्निंग वॉक करत असतात. अशा पादचाऱ्यांना एकटे गाठून त्यांना खोटी कारणे देऊन किंवा चलाखीने त्यांच्या जवळील ऐवज, मोबाईल चोरायचे अशी नवीन क्लृप्ती चोरट्यांनी अवलंबली आहे.

या परिसरात चोऱ्या, घरफोड्या, वाटमाऱ्या, सशस्त्र लूटमारीच्या घटना वाढल्याने स्थानिक रामनगर आणि टिळकनगर पोलिसांनी या भागातील दिवस-रात्र गस्त वाढविली आहे. पाच दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील म्हसोबा चौकात रामनगर पोलिसांनी सात दरोडेखोरांची टोळी शस्त्र साठ्यासह जेरबंद केली आहे. हे सात बदमाश डोंबिवलीच्या ठाकुर्ली, खंबाळपाडा, पाथर्ली, त्रिमूर्तीनगर, चोळे भागात राहतात. तसेच या चोरटयांचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT