औरंगाबाद : शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात आणल्या अस्थी | पुढारी

औरंगाबाद : शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात आणल्या अस्थी

पैठण: पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील गेवराई बाशी येथे जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. दरम्यान, एमआयडीसी पोलीस आणि तहसील विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या अस्थी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणून संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील गेवराई बाशी येथील शेतकरी शेषराव सोमाजी खुटेकर यांचा शेती जमिनीच्या वादातून भावकीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्रस्त झालेल्या शेषराव यांनी बुधवारी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. शेषराव यांनी पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, अरुण शेषराव खुटेकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर शेषराव यांच्या अस्थी आणून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, नातेवाईकांनी घेतलेल्या संतप्त पवित्रामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल दाखल झाले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button