पिंपरी : औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरीवर पोलिसांचा ‘वॉच’

पिंपरी : औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरीवर पोलिसांचा ‘वॉच’
Published on
Updated on

संतोष शिंदे : 

पिंपरी : शहर परिसरातील औद्योगिक पट्ट्यात सुरू असलेल्या कंपन्यांतील छोटी-मोठी कंत्राट मिळवण्यासाठी स्थानिकांमध्ये धुसफूस सुरू आहे. यातून अनेकदा हाणामार्‍यादेखील झाल्या आहेत. कंत्राटासाठी काहीजण थेट कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांवर दबाव टाकतात. मात्र, त्यांच्या दहशतीपोटी कोणीही समोर येऊन तक्रार देत नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांच्या गुप्त बैठका घेऊन त्यांना विश्वासात घेण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कामगारनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात उदरनिर्वाहाच्या शोधात देशभरातून आलेला कामगारवर्ग स्थिरावला आहे. या कामगारांच्या भरवश्यावर शेकडो कंपन्या सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने चाकण, भोसरी एमआयडीसी, पिंपरी, तळेगाव एमआयडीसी या परिसरातील टाटा मोटर्स, महिंद्रा जनरल मोटर्स, बजाज, थरमॅक्स, फिनोलेक्स, मर्सिडीज बेंज, थिसेनक्रुप आदी नामंकित कंपन्या येतात. तसेच, हिंजवडी आणि तळवडे येथे इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, पर्सिस्टंट, कॅपजेमिनी, स्टेरिया, सेंटल अशा माहिती तंत्रज्ञानविषयक काम करणार्‍या मोठ्या कंपन्या आहेत.

या सर्व कंपन्यांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र वरवर दिसून येते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. कंपन्यांतील छोटी मोठी कंत्राट मिळवण्यासाठी स्थानिक गावगुंड दहशत माजवतात. तसेच, बोगस माथाडी संघटना, विनापरवाना सुरू असलेल्या शेकडो सुरक्षा एजन्सीज हादेखील उद्योग क्षेत्रातील कळीचा मुद्दा आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिकांनादेखील बोगस माथाडी संघटनांचा त्रास आहे. माथाडीचे कंत्राट मिळवण्यासाठी दहशत हेच प्रमाण मानले जात असल्याने गुन्हेगारी क्षेत्रातील तरुणांचा याकडे जास्त ओढा आहे. एवढेच नाही, तर कंपन्यांमधून बाहेर पडणारे भंगार उचलण्यासाठीदेखील जीवघेणी स्पर्धा सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.

पडद्याआडच्या या दहशतीमुळे कोणीही समोर येऊन तक्रार देत नाही. त्यामुळे पोलिसांनादेखील कारवाई करताना अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकांना दिले. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकांनी औद्योगिक पट्ट्यात गुप्त बैठका घेऊन माहिती संकलित केली आहे.

हिंजवडी परिसरात सर्वाधिक औद्योगिक गुंड
पोलिसांनी माहिती संकलित केलेल्या 48 पैकी 21 औद्योगिक गुंड हिंजवडी आयटी हब परिसरातील आहेत. यामध्ये मुळशी खोर्‍यातील नामचीन गुंडांचादेखील समावेश आहे. हिंजवडी आयटी हबमधील कंत्राट मिळवण्यासाठी जिल्ह्यातील टोळ्या लक्ष ठेवून असतात. त्यामुळे पोलिसांना या भागात विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच, कंपन्यांच्या पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचे काम सुरू आहे. काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास कंपनीच्या पदाधिकार्‍यांनी नजीकच्या पोलिसांना याबाबत अवगत करून देणे आवश्यक आहे.
– अजय जोगदंड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी- चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news