डहाणू शहरात शुक्रवार दि.१५ रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास लागलेल्या आगीत तीन दुकाने भस्मसात झाली. या आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती डहाणू पोलिसांनी दिली. डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयासमोर जनक स्टोर, इंटवाला टेलर आणि शामलाल पजवाणी अशी ही दुकाने होती. दुकानाचा तळ मजला तसेच पहिला मजला आगीत जळाला आहे.
स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर डहाणू नगरपरिषद, अदानी पॉवर स्टेशन, पालघर नगरपरिषद, बोईसर औद्योगिक वसाहत आणि लगतच्या गुजरात राज्यातील अग्निशमन दलाला पहाटे सहा वाजता आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
जनक स्टोर मध्ये ही आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे आयुर्वेदिक औषधे आणि पूजेचे समान असलेले दुकान असून सणानिमित्त माल भरला होता.
पुजेच्या साहित्यातील तूप, हवन सामुग्रीने पेट घेतला. तर फटाक्यांमुळे छोट्या-मोठ्या स्फोटांनी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
हे डहाणू शहरातील अंत्यसंकाराचे साहित्य विकणारे दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले.
प्रकाश जीवनजी इंटवाला यांच्या इंटवाला गारमेंट या कापडाच्या दुकानातील ताग्यातील कापड व रेडिमेड ड्रेस, ब्लॅंकेट इ. मुळे आग अधिकच भडकली. लगतच्या पजवाणी सिमेंट व पत्रे या हितेश पजवाणी यांच्या दुकानाचेही नुकसान झाले आहे.