Thane Tourists Stranded Dubai Pudhari
ठाणे

Thane Tourists Stranded Dubai: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; दुबईत अडकलेल्या ठाणे जिल्ह्यातील 66 पर्यटकांपैकी 26 जण सुखरूप परत

अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर विमानसेवा विस्कळीत; उर्वरित 40 पर्यटकांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करताच मध्य पूर्वेत भडकलेल्या युद्धाची झळ भारतीयांना बसली आहे. हवाई मार्ग बंद झाल्याने ठाणे जिल्ह्यातील 66 पर्यटक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. त्यापैकी शहापुर तालुक्यातील 23 प्रवाशी आणि ठाण्यातील भाईंदर पाड्यातील 3 पर्यटक असे 26 जण आपापल्या घरी सुखरूप पोहचले आहेत. उर्वरित 40 प्रवाशांना लवकरच मायदेशी सुखरुप आणले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील 66 जण दुबईत अडकले आहेत. त्यात 12 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. हे पर्यटक ठाणे, शहापूर, भिवंडी, सी. बी. डी बेलापूरमधील आहेत. शहापूर तालुक्यातील 23 फेब्रुवारीला पर्यटनासाठी ते दुबईत गेले होते. त्यामध्ये शहापूर तालुक्यातील नांदगाव, चिंचवली, सावरोली, भातसई, खातिवली, वाशिंद या गावातील पर्यटकांचा समावेश होता. रविवारी हे सगळे मायदेशी परतणार होते.

परंतु युद्धामुळे विमानसेवा बंद झाल्याने त्यांना भारतात परतता आले नाही. या पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या दोन विशेष विमानाने मंगळवारी सुखरूप आणण्यात आलेल्या पर्यटकांमध्ये शहापूरमधील 23 आणि ठाण्यातील भाईंदर पाडा येथील लोढा लुक्युरिया गृहसंकुलातील 3 अशा 26 पर्यटकांचा समावेश आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी हे इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेले. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाला आणि इस्रायलसह कुवैत, यूएई, कतार आणि इतर देशांवर हल्ला केला. मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून अशांतता पसरली आहे. त्यामुळे आखाती देशात पर्यटनासाठी गेलेल्या सर्व भारतीयांना परत आणण्याचे प्रयन्त सुरु झाले आहेत. या प्रवाशांमध्ये ठाणे जिल्ह्यातील 66 प्रवाशांचा समावेश आहे. त्यामध्ये शहापूर तालुक्यातील 23 प्रवाशी, भिवंडी तालुक्यातील कामतघर येथील 9 पर्यटक, अंजूर दिवे 2 असे 9 प्रवाशी आहेत. ठाण्यातील ढोकाळी

येथील 4 , कोपरीमधील 3, भाईंदर पाडा 3, हिरानंदानी इस्टेट 2, कोलबाड 3, दोस्ती इम्पेरिया 5 प्रवाशांचा समावेश आहे. सीबीडी बेलापूर नवी मुंबईतील दोन प्रवाशांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील 66 प्रवासी अडकले होते. त्यापैकी 26 प्रवाशांना सुखरूप परत आणण्यात आले. तर 40 प्रवाशांना आणण्याचे प्रयन्त सुरु आहेत. फ्लाईटच्या वेळा आणि तारखा वेगवेगळ्या असल्याने ते प्रवाशी सुखरूप लवकर भारतात परततील असे ठाणे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT