

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती व महिला, बाल कल्याण समिती सभापती तसेच उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी 4 मार्च रोजी पार पडणार आहे. स्थायी सभापतीसाठी भाजपकडून हसमुख गेहलोत तर काँग्रेसकडून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीसाठी भाजपकडून अनिता पाटील व उपसभापतीसाठी हेमा बेलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या समितीतील विरोधकांच्या अपुऱ्या सदस्य संख्येमुळे त्यांनी उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे पाटील व बेलानी यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थायी समिती सभापतीसाठी भाजपचे हसमुख गेहलोत व काँग्रेसचे अनिल सावंत यांनी 2 मार्च रोजी नगरसचिव दिनेश कानगुडे यांच्याकडे उमेद्वारी अर्ज दाखल केला. यातील हसमुख यांची बहुमताने निवड होणार असल्याचे तूर्तास स्पष्ट झाले आहे. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून एकूण 95 पैकी 78 नगरसेवक भाजपचे आहेत. तर काँग्रेस व शिवसेनेच्या
मिरा-भाईंदर विकास आघाडी अनुक्रमे 13 व 3 असे एकूण 16 नगरसेवक आहेत. यामुळे हसमुख यांच्या पारड्यात भाजपचे 78 तसेच एका अपक्ष नगरसेवकाचे अशी एकूण 79 मते पडणार आहेत. त्यामुळे हसमुख यांची सभापती पदावर बहुमताने निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचप्रमाणे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी भाजपकडून अनिता पाटील तर उपसभापतीसाठी हेमा बेलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या समितीत एकूण 9 सदस्य असून त्यात भाजपच्या सदस्यांची संख्या 7 तर विरोधी पक्षातील काँग्रेसच्या सदस्यांची संख्या 2 इतकी आहे.
काँग्रेसकडून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. उमेदवाराला सूचक व अनुमोदक यांची आवश्यकता असते. त्यासाठी संबंधित समितीत त्या पक्षाच्या पुरेशा सदस्यांची आवश्यक ठरते. या समितीत काँग्रेसचे केवळ दोनच सदस्य असल्याने सूचक व अनुमोदक यांची पुरेशी संख्या उपलब्ध नाही. यामुळे काँग्रेसकडून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे समिती सभापती- पदी अनिता पाटील तर उपसभापतीपदी हेमा बेलानी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.