Pradeep Purnkear Case Pudhari
ठाणे

Pradeep Purnekar Case | ‘अगला गेम तेरा’! प्रदीप पूर्णेकर यांच्या पुतणीला धमकी; कुटुंबियांची पोलिस संरक्षणाची मागणी

हत्येच्या १८ दिवसांनी मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट; कुटुंबीयांकडून नाराजी

पुढारी वृत्तसेवा

Pradeep Purnekar Niece Threat

ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच त्यांच्या पुतणी खुशबू पूर्णेकर हिला मोबाईलवरून धमकीचा संदेश आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘अगला गेम तेरा’ असा संदेश आल्याचा आरोप खुशबू हिने केला आहे. या प्रकारामुळे पूर्णेकर कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबाला तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर तब्बल १८ दिवसांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कुटुंबीयांनी आपली नाराजी व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आधीच असुरक्षिततेची भावना असताना खुशबू पूर्णेकर हिला धमकीचा संदेश आल्याचा दावा करण्यात आला आहे. खुशबू ही प्रदीप पूर्णेकर यांचे बंधू जायनाथ पूर्णेकर यांची मुलगी आहे. मोबाईलवर ‘अगला गेम तेरा’ असा संदेश आल्याचे तिने मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीदरम्यान सांगितले. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबीयांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला १८ दिवस उलटल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, एवढ्या दिवसांनी भेट घेण्यात आल्याने कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीने संबंधित महिला मोकाट फिरत असल्याचा आरोप केला. तसेच राजा शिंदे याच्या चौकशीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

‘चौकशीच्या नावाखाली चहा-पाणी देऊन सोडून दिले जाते. आरोपींना आमच्यासमोर कठोर शिक्षा झाली पाहिजे,’ अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.

सत्तेपेक्षा माणुसकी मोठी असते. मीनाक्षी शिंदे यांना पदावरून हटवले पाहिजे. त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून, याची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.

प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी हत्येच्या दिवशी हेल्मेट घातलेला व्यक्ती राजा शिंदे असल्याचा दावा केला. या प्रकरणातील पुरावे पूर्णेकर कुटुंबीयांकडून दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या दाव्यांची पोलिस तपासातून पडताळणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही’ - मंत्री सरनाईक

मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ‘तुमच्यावर अन्याय होणार नाही. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचे प्रत्येकालाच दुःख आहे. या प्रकरणात काही लोकांनी राजकारण केले. आम्ही पहिल्या दिवसापासून संपर्कात आहोत. राम यांच्याशीही बोलणे झाले आहे. आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत,’ असे सरनाईक म्हणाले.

या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका मांडताना सरनाईक यांनी आरोपींना भरचौकात फाशी देण्याची मागणी केली. तसेच कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वैयक्तिक पातळीवर सर्व वकील उभे करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

एकनाथ शिंदेंशी गैरसमज करून घेऊ नका

या वेळी सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत गैरसमज करून घेऊ नका, असे आवाहन पूर्णेकर कुटुंबीयांना केले. त्यांनी राम पूर्णेकर यांच्याशी एकनाथ शिंदे यांचा फोनवरून संवादही घडवून आणला. त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT