

Deputy CM Shinde Bungalow Protest
ठाणे : शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केलेल्या हेल्मेटधारी आरोपी भलताच असल्याचा संशय वाटतो. तसेच माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची अटक आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर नवरात्रीमध्ये आंदोलन करणार असल्याचे पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी सोमवारी (दि.१२) पत्रकार परिषेदेत जाहीर केले.
माझे वडील प्रदीप पूर्णेकर हे निडर होते, मला या लोकांची भीती वाटते, ते माझ्या जीवाचे काहीही करू शकतात. पोलिसांनी अटक केलेला पाचवा हेल्मेटधारी आरोपी हा खुनाच्या वेळी बाईकवर बसलेला आरोपी वाटत नाही. त्या आरोपीची शरीरयष्टी आणि पोलिसांनी पकडून आणलेल्या आरोपीची शरीरयष्टी पाहता, कुणीही संशय व्यक्त करेल असा दावा राम पूर्णेकर यांनी करून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या खुनाचा तपास सीबीआय अथवा सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, याकरिता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, मात्र अद्याप भेट होऊ शकली नाही, अशी खंत ही पूर्णेकर यांनी व्यक्त केली.
माझ्या वडिलांच्या खुनाचा मास्टर माईंड हे मीनाक्षी शिंदे असल्याचा पुनरुच्चार करीत त्यांना अटक होऊन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हायला हवी. मीनाक्षी यांचा शिवसेनेने राजीनामा घ्यायला हवा, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, या मागण्यांसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर नवरात्री दरम्यान आंदोलन करणार आहे. आंदोलनाला परवानगी मिळो या न मिळो, मी एकटा तरी आंदोलन करणार, असा निर्धार पूर्णेकर यांनी व्यक्त केला.
पोलिसांवर असलेला राजकीय दबाव पाच मिनिटांसाठी काढा, बघा लगेच खुनाचा उलघडा होईल, असा दावा त्यांनी केली. आरोपी आणि त्यांच्या सूत्रधारांमुळे मला भीती वाटते असे सांगत स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे पूर्णेकर यांनी सांगून शिंदे दाम्पत्य अटक होईपर्यंत शांत बसणार नाही, असे स्पष्ट केले.