

ठाणे: ठाण्यातील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केलेल्या संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि हेल्मेटधारी आरोपी अमित सिंग यांना सोमवारी ठाणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
यावेळी न्यायालयाने दोघांना 19 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर या प्रकरणातील अटक आरोपी पप्या शिंदे यास देखील न्यायालयाने एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथून अटक करण्यात आलेला आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली (41) आणि हेल्मेट परिधान केलेला आरोपी अमित सिंग उर्फ पपलू (34) या दोघांना घेऊन ठाणे गुन्हे शाखेचे पथक रविवारी ठाण्यात पोहचले. त्यानंतर या दोघांना सोमवारी ठाणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
आरोपींना ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.बी. साबळे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना 19 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या घटनेचा संपूर्ण तपास व सुत्रधाराची माहिती याबाबत चौकशी करणे गरजेचे असल्याने या दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर केली.
या हत्येमागचा मुख्य सूत्रधार वेगळाच व्यक्ती असल्याचे सरकारी वकिलाकडून न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. तर या गुन्ह्यात पहिल्याच दिवशी अटक करण्यात आलेला आरोपी पप्या शिंदे यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास देखील सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यास एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. दरम्यान, या हत्याकांडातील पाचही आरोपी अटकेत आल्याने त्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे होणार आहेत. त्यामुळे आरोपींच्या चौकशीतून कोणत्या बाबींचा उलगडा होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
चॉपरसह हत्येतील महत्त्वाचे धागेदोरे अद्याप हाती नाहीत
या गुन्ह्यातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी हत्येसाठी वापरण्यात आलेले चॅापर अजूनही सापडून आलेले नाही. तर मोबाईल, हत्यार, गाड्या आरोपींना कुठून आणल्या होत्या? या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? या महत्वाच्या बाबींचा तपास आता ठाणे गुन्हे शाखेचे एसआयटी पथक करणार आहेत.