ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत सकाळपासूनच गोंधळ पाहायला मिळाला. मतदानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीलाच काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे प्रकार घडले. तर काही ईव्हीएम मशीनला शॉक लागत असल्याच्या तक्रारी देखील मतदारांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रिया वेळेत सुरू होऊनही या सर्व कारणांमुळे काही ठिकाणी 20 ते 25 मिनिटे मतदान प्रक्रिया थांबवावी लागली.
दुसरीकडे अनेक मतदार याद्यांमधील मतदारांची नावेच गायब असल्याचे प्रकार पुढे आले आहेत तर काही ठिकाणी मतदान केंद्र शोधताना नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावरच मतदारांनी या निवडणुकी दरम्यान संताप व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये वेद हिंदी विद्यालयातील मतदान केंद्रावर 20 मिनिटे ईव्हीएम मशीन बंद होती. त्यानंतर तत्काळ दुसऱ्या मशीन या ठिकाणी बसवण्यात आल्या. ज्यांनी मतदान केले त्याचा सर्व्हर मात्र तोच असल्याने यासंदर्भात या ठिकाणी काही मतदारांनी आक्षेप देखील घेतला. या ठिकाणी केवळ मशीन दुसऱ्या बसवण्यात आल्या आहेत. कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मध्ये न्यू कळवा हायस्कूल येथील मतदान केंद्रात मशीनचे बटन दाबण्यात अडचण येत होती. जुन्या मशीन असल्याने या अडचणी मतदारांना येत होत्या.
काही ठिकाणी मशीन देखील बदलाव्या लागल्याने झालेल्या विलंबामुळे मतदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी मतदानाला मतदारांचा मतदानाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला तर काही ठिकाणी मात्र मतदान केंद्रांवर कमी गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी मशीनमध्ये अ,ब,क,ड असा क्रम सुलट लावण्यात आल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
वागळे इस्टेटमधील श्रीनगर परिसरातील मतदान केंद्रावर शिंदे गटाचे चिन्ह आणि उमेदवारांची नावे झळकवणारे पोस्टर लावण्यात आले होते. शिंदे गटाच्या या कारनाम्यामुळे परिसरात मोठा राडा झाला. दरम्यान, मनसे नेते अविनाश जाधव यांची निवडणूक अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली.