Thane Civil Hospital Pudhari
ठाणे

Thane Civil Hospital: ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे लोकार्पण रखडले; प्रशासकीय मान्यतेनंतरच उद्घाटन

900 बेडच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी आणखी 3-4 महिन्यांची प्रतीक्षा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठया 900 बेड असलेल्या मल्टीस्पेशालिटी ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे उद्घाटन 9 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने करायचे होते. मात्र, यामध्ये काही प्रशासकीय मान्यता बाकी होती. त्यामुळे येत्या तीन ते चार महिन्यांत प्रशासकीय मान्यतेची पूर्तता करूनच सिव्हिल रुग्णालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या आनंदोत्सवमध्ये शनिवारी आरोग्यमंत्री आबिटकर उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आरोग्य विभागाचे ठाणे सिव्हिल रुग्णालय हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे 900 बेडचे एकमेव मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे. ठाणे जिल्ह्यामधील हे महत्त्वपूर्ण रुग्णालय आहे.

या वेळी त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणाबाबत विचारणा केली असता, यासंदर्भात आरोग्य विभागाच्या संचालकाला सूचना देण्यात आली असुन वस्तुस्थिती पाहुन कारवाई करू. यामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने आमच्या आरोग्य विभागाकडून आम्ही तपास करू. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे ते म्हणाले. दोन ते तीन दिवसांत याचा प्राथमिक अहवाल येईल, असेही त्यांनी सांगितले.

असा आहे सामान्य रुग्णालयाचा प्रवास.....

1936 साली दानतपस्वी नारायण विठ्ठल सायन्ना यांनी ही इमारत आपले वडील विठ्ठल सायन्ना यांच्या स्मृति प्रित्यर्थ रुग्णालयासाठी दान केली होती. 22 एप्रिल 2023 रोजी अक्षयतृतियेच्या मुहुर्तावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सिव्हीलच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी 18 महिन्यात रुग्णालय उभारण्याचे जाहिर करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयावरील हेलीपॅड आदी खास सुविधांच्या उभारणीमुळे कामाला विलंब झाला. तर आता प्रशासकिय मान्यता अभावी रुग्णालयाचे लोकार्पण रखडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT