ठाणे

ठाणे: कल्याण येथील सहाय्यक दुय्यम निबंधक १२ हजारांची लाच घेताना जाळ्यात

अविनाश सुतार

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा : घराचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी एका ग्राहकाकडे कल्याण पूर्वेकडील कार्यालयातील सहाय्यक दुय्यम निबंधकाने पैशांसाठी तगादा लावला होता. ठरलेली रक्कम स्वीकारताना या सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन तपास सुरु करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेकडील असलेल्या कार्यालयाशी संबंधित असलेल्या या अधिकाऱ्याचे नाव राज कोळी असे आहे. या संदर्भात संबंधित ग्राहकाने घर विकत घेतले होते. या घराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी राज कोळी याने सदर ग्राहकाकडे 24 हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडीअंती 12 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. एकीकडे या पैशांसाठी सहाय्यक दुय्यम निबंधक राज कोळी याने तगादा लावला होता.

तर दुसरीकडे तक्रारदाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पथकाने तांत्रिक पडताळणी केल्यानंतर सापळा रचला. या सापळ्यात सहाय्यक दुय्यम निबंधक राज कोळी अलगद अडकला. त्याला 12 हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी स्थानिक महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यासह अन्य एकजण ताब्यात

ठरल्यानुसार तक्रारदार बुधवारी सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील सहदुय्यम निबंधक कार्यालयात आले. यावेळी राज कोळी याने तक्रारदाराकडून 12 हजार स्वीकारले. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. लाचखोर राज कोळी याच्यासह त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका खासगी इसमाला देखिल लाच विरोधी पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT