ठाणे : मुरबाड येथील म्हसा यात्रेत ४ लाख भाविकांनी घेतले श्री खांबलिंगेश्वराचे दर्शन | पुढारी

ठाणे : मुरबाड येथील म्हसा यात्रेत ४ लाख भाविकांनी घेतले श्री खांबलिंगेश्वराचे दर्शन

बाळासाहेब भालेराव

मुरबाड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील म्हसा यात्रेला गुरूवारपासून (दि.२५) सुरुवात झाली. या तीन दिवसांत सुमारे ४ लाख भाविकांनी श्री खांबलिंगेश्वराचे दर्शन घेतले.

यात्रेतील प्रसिद्ध बैल बाजारात खरेदी-विक्रीत मोठी उलाढाल झाली. एक बैल १ लाख १० हजारांना जुन्नर येथील व्यापारी देवराम लांडे यांनी विकला आहे. तर बैलजोडीची किंमत सुमारे अडीच लाखांच्या घरात गेली होती. त्यामुळे यंदा बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले, अशी माहिती कोरावळे येथील बैल व्यापारी धनाजी गणपत धुमाळ यांनी दिली. तसेच म्हसा यात्रेतील बाजारात स्वेटर, ब्लँकेट, घोंगडीची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याची माहिती ब्लँकेट व्यापारी देत आहेत.

म्हसा ग्रामपंचायतीकडून भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा पुरवल्या. ६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, तसेच सार्वजनिक शौचालय, औषधे व औषध फवारणी, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती म्हसा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी टोहके यांनी दिली. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे मुरबाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button