ठाणे : मिरारोडमध्ये ‘बुलडोझर कारवाई’; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश | पुढारी

ठाणे : मिरारोडमध्ये ‘बुलडोझर कारवाई’; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

भाईंदर; राजू काळे : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मीरारोडच्या नयानगर परिसरात रामभक्तांच्या रॅलीवर हल्ला करणार्‍यांच्या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविण्याचे आदेश पालिकेला दिले. त्यानुसार पालिकेने मंगळवारी (दि. २३) मोठ्या पोलीस बंदोबस्तात या कारवाईला सुरुवात करीत एकूण 15 दुकाने व 2 शेडवर बुलडोझर चालविला. यात 7 दुकाने सपाट केली गेली. यामुळे कारवाईचे आदेश देणारे फडणवीस राज्यातील ‘बुलडोझर बाबा’ ठरल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.

यापूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अंमल करून दंगल घडविणार्‍या तसेच उपद्रव करणार्‍यांच्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालविला होता. त्यामुळे त्यांना बुलडोझर बाबा म्हणून संबोधले जाऊ लागले असतानाच महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यंदा बुलडोझर बाबाच्या भूमिकेत दिसून आले आहे. अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिरा-भाईंदर शहरात मोठ्याप्रमाणात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या पूर्व संध्येला मीरारोडच्या नयानगर या ठिकाणच्या लोढा कॉम्प्लेक्स परिसरातून काढण्यात आलेल्या रॅलीतील रामभक्तांवर काही समाजकंटकांनी अचानक हल्ला चढविला. त्यात महिलांसह अनेक रामभक्तांना जखमी करण्यात आले. त्यांच्या वाहनांची तोडफोड करीत हिंदू देवतांची विटंबना केली. तसेच सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट करीत दोन गटांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचे तीव्र पडसाद राज्यासह शहरभर उमटल्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत नागपूर, मिरा-भाईंदरमधील उपद्रव करणार्‍यांच्या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्याचे आदेश त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनांना दिले. यामुळे फडणवीस हे राज्यातील बुलडोझर बाबा ठरलेल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. तर पालिकेने फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करून मंगळवारी मोठा फौजफाटा घेऊन नयानगर परिसरातील अनधिकृत बांधकामांकडे कूच केली.

कारवाईच्या पहिल्याच दिवशी येथील हैदरी चौक परिसरात असलेल्या 8 दुकानांच्या वाढीव बांधकामांसह शेडवर तोडक कारवाई केली. याच परिसरातील त्रिवेदी कॉम्प्लेक्स मधील 7 अनधिकृत दुकाने थेट पाडण्यात आली. या कारवाईसाठी पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हि कारवाई पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड, विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. येथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई यापुढे सुद्धा सुरु राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Back to top button