ठाणे

ठाणे: खडवली नदीत उतरण्यापूर्वीच 3 मुले ताब्यात; कल्याणच्या एमएफसी पोलिसांचे कौतुक

अविनाश सुतार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याणात राहणारी शाळकरी तीन मुले खडवली नदीत आंघोळी जाणार होती. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी एक मुलगी आणि दोन मुलांना खडवलीच्या नदी परिसरातून शोधून काढले. कदाचित ही मुले नदीत उतरली असती तर मोठा अनर्थ घडला असता. या मुलांना वेळीच शाेधल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मुलांना शोधून काढणाऱ्या महात्मा फुले चौक पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात राहणारे विजय तोंबर यांची मुले जोशी बागेतील शाळेत शिकतात. बुधवारी दुपारी मुले शाळेत गेली. शाळेच्या गेटवर या तिघांना त्यांचे शिक्षक भेटले. त्यानंतर ही मुले अचानाक बेपत्ता झाली. मुले घरी न आल्याने त्यांचे वडील विजय तोंबर यांनी शोध घेतला. मात्र मुले कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या विजय यांनी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. एकाच वेळी तिन्ही मुले बेपत्ता झाल्याने त्यांना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली.

कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपआयुक्त सचिन गुंजाळ, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने, पोलिस निरिक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी किरण भिसे, स्वाती जगताप, रविंद्र हासे, सुमित मधाळे, सूचित टिकेकर, आनंद कांगरे यांच्या पथकाने मुलांचा शोध सुरू केला. कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये ही तिन्ही मुले आसनगावच्या दिशेने लोकलने गेल्याचे दिसून आले. पोलिसांचे पथक खडवलीत पोहोचले असता ही तिन्ही मुले नदी परिसरात सापडली. आम्ही खडवली नदीत आंघोळीसाठी निघालो होतो, असे मुलांनी सांगितल्याने पोलिसही अवाक् झाले. ही मुले नदीत उतरली असती तर त्यांचे काय झाले असते. सुदैवाने ही मुले सुखरूप सापडली आहेत. त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT