ठाणे : ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचे निधन | पुढारी

ठाणे : ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचे निधन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा आपल्या गायकीच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला बळ देणाऱ्या ज्येष्ठ गायिका वैशाली शिंदे यांचे आज (शुक्रवार) दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 62 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजता घाटकोपर येथील भटवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वैशाली या मधुमेहाने ग्रस्त होत्या. त्यातच त्यांच्या पायाला गँगरीन झाले होते. केईएम मध्ये त्‍यांच्यावर उपचार सुरू असतांनाच त्यांचे निधन झाले.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ सारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या वैशाली यांना सुरांची देण आई – वडिलांकडून मिळली होती. ते दोघेही मोलमजूरीचे काम करत. त्यांचे आई – वडील दोघेही घरात आंबेडकर आणि बुध्दांची महती सांगणारी गाणी म्हणत. त्यातून वैशाली यांच्यातील गायिका घडत गेली. आई – वडिलांनी रोजगारासाठी पुण्यात स्थलांतरित झाले.

विष्णू शिंदे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. कवी लक्ष्मण राजगुरू यांनी त्यांना गाण्यातील बारकावे शिकवले. वैशाली यांच्या दमदार आवाजाने आंबेडकरी चळवळीतील गीते सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत झाली. जलशांमधून त्यांनी आपली गायकी पेश केली.कव्वाली, जंगी सामन्यांमधून त्यांनी आपल्या गायकीचा ठसा उमटवला. नाव भीमानं माझ्या गाजवल.बोलो जयभीम बोलो यासारखी त्यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत.

हेही वाचा : 

Back to top button