Women Day Special Stories Pudhari
ठाणे

Women Day Special Stories: ‘त्याने‌’ सोडले म्हणून काय झाले...‌‘ती‌’ जिद्दीने जगतेय!

महिला दिन विशेष : घटस्फोट, पतीचे निधन आणि गरिबीच्या संकटावर मात करत मुलांसाठी लढणाऱ्या धाडसी महिलांची प्रेरणादायी गाथा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : अनुपमा गुंडे

नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून मी घटस्फोटाचा निर्णय घेतला. जरा दुर्लक्ष करायचे..मुलासाठी..चालायचेच... असे सल्ले मला दिले गेले. मी स्वावलंबी असूनही मला सुरुवातीला माझ्या माहेरचाही पाठिंबा नव्हता. त्याला कोणतीच जबाबदारी नको होती. त्यामुळे मुलाचा ताबा अर्थातच माझ्याकडेच आला. कोर्टाच्या तारखांनाही तो येत नव्हता. मग शेवटी मी तडजोडीतून घटस्फोट घेतला. मी सरकारी नोकरीत म्हणून त्याने मला फुटकी कवडीही दिली नाही. आता मी मुलाचे शिक्षण, माझी नोकरी सगळे करते. घटस्फोटाचा निर्णय धाडसाने घेणारी अश्विनी (नाव बदलले आहे) मनमोकळे बोलत होती. अशाच कथा एकटी, पण धाडसाने जगणाऱ्या व मुलांना जगवणाऱ्या नैना, नवसा, दुर्गा, प्रिया यांच्याही आहेत.

नवरा जाऊन 10 वर्षे झाली. घरादाराचे काम करून सकाळी 8-9 पर्यंत कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवर जायचे. दिवसभर कचऱ्यातून भंगार, प्लास्टिक गोळा करायचे अन्‌‍ ते विकायचे. त्यातून कधी 200 तर कधी चारशेही मिळतात. घरचा माणूस गेला म्हणून पोराचे आणि घरच्यांचे पोट भरण्यासाठी राबावे लागतेच, तेव्हा कुठे चार घास पोटात जातात. कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडचा कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या नवसा वाघे आणि नैना वाघे. आयुष्यात आलेल्या परिस्थितीचा सामना करत दोघीही जगत आहेत.

मुलांच्या शिक्षणासाठी जास्त कामाचा निर्धार

बाईचे एकटीने जगणे सोपे नाही. डम्पिंग ग्राऊंडवरील हर एक माणसाचे कमी अधिक प्रमाणात असेच गाऱ्हाणे आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांचा आधार वाटतो. पावसाळ्यात डम्पिंग ग्राऊंड ओले झाले की पावसाळ्यात रोजगार बंद होतो. मग आम्ही दोघीही भातलावणीच्या कामाला जातो, असे नवसा आणि नैना दोघीही सांगतात. नातेवाईकांच्या टोमण्यांनी 12 वीपर्यंत शिकलेल्या मुलीला पुढे शिकवण्याची इच्छा असूनही नवसा यांनी 18 व्या वर्षी लेकीचे लग्न लावून दिले. दुसरी लेक सहावीत आहे. नैना यांना 2 मुली एक मुलगा. त्यांना शिकवण्यासाठी जास्तीचे काम करायचे, असा निर्धार तिने केला आहे.

कोरोनात नवरा गेला अन्‌‍ ती ‌‘दुर्गा‌’ झाली...

श्रीरामपूरच्या संजयनगरमध्ये राहणाऱ्या दुर्गा नाटकर यांचे पती कोरोनाने गेले. तीन मुली आणि एक मुलगा. पतीच्या निधनानंतर महिन्याने मुलाचा जन्म झाला. ते मिस्त्री काम करत. दुर्गा शेण उचलायला जात. मुली मुलाला सांभाळत. पण मुलगा मोठा झाल्यावर मागे लागायचा. मग त्यांनी धुणी-भांड्याची कामे सुरू केली. या बळावर मुलीची बारावी केली. दुर्गा म्हणते, माझी नणंद चांगली आहे. तिच्याच घरात एका बाजूला आम्हाला आसरा दिला. आता पुढची गणिते कशी जुळवायची याच विचारात दुर्गा आहे.

पण नवऱ्याने साथ दिली नाही...

प्रेमविवाह करून घटस्फोट झालेल्या प्रियाला तर खूपच चटके सहन करावे लागले. लग्नानंतर नव्याचे 9 दिवस संपल्यानंतर सासरच्यांनी नात्यातील भरभक्कम हुंडा आणणारी मुलगी सून म्हणून आल्याने प्रियाला त्रास द्यायला सुरुवात केली. नवऱ्याने साथ दिली नाही. प्रिया म्हणते, घरच्यांच्या विरोधात जाऊन मी लग्न केल्याने माहेरचाही आधार नव्हता. मैत्रिणीने आधार दिल्याने मी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटाला मीच जबाबदार आहे, असे समजून मला आरोपीच्या पिंजऱ्यात सासरच्यांनी आणि समाजाने उभे केले. यातून बाहेर पडायला किती वेळ लागेल, हे त्यांना सांगता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT