

मुंबई : वीस लाख रुपयांच्या लाचप्रकरणी नाशिकचे राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे, सहायक राज्य कर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे आणि खासगी व्यक्ती अमीत हिरामण जाधव अशा तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई युनिटने नाशिकमध्ये अटक केली.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचे नाशिकमध्ये एक कार्यालय आहे. त्यांच्याविरुद्ध वस्तू आणि सेवाकर कार्यालयातून कारवाई सुरु करण्यात आली होती. याच संदर्भात त्यांनी उपायुक्त सोमनाथ पागे आणि सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांची भेट घेतली होती.
या भेटीत त्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी तसेच गुन्ह्यांत मदत करण्यासाठी सव्वाकोटीची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना एक कोटी देण्याचे आश्वासन दिले होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई युनिटमध्ये संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर या पथकाने शुक्रवार 6 मार्चला नाशिकच्या कार्यालयात सापळा लावला.
यावेळी लाचेचा वीस लाखांचा पहिला हप्ता घेताना अमीत जाधव या खासगी व्यक्तीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्या चौकशीत या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर या पथकाने सोमनाथ पागे आणि
मच्छिंद्र दोंदे यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 7 अ, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अप्पर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चव्हाण व पथकाने केली.