Women Day Special Stories: जिगरबाज एकल महिलांचा संघर्ष; संसाराचा गाडा एकटीने हाकणाऱ्या सिंगल मदर्सची प्रेरणादायी कहाणी
रायगड : ऋषिता तावडे
एकल महिलांची संसाराचा गाढा हाकण्यासाठी होत असलेली जीवघेणी परिश्रमाची कहाणी काहीशी थांबावी, यासाठी राज्य सरकारने एकल महिला अर्थसाहाय्य योजना अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. एका बाजूला 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला एकल महिलांना सुरुवातीला 50 हजारांचे अर्थसाहाय्य, तर पुढील कालावधीत व्यवसायासाठी बँकांमार्फत अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. महिला दिनानिमित्त जिगरबाजपणे संसाराचा गाडा हाकणाऱ्या अशाच एकल महिलांच्या कथा जाणून घेऊया.
यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींचे अनुदान कायम सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या बाजूला एकल महिलांना अर्थसाहाय्य आणि महिला उद्योजक वाढावेत यासाठी व्यवसायातील महिलांना मदत देण्याचे धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. यामुळे महिला घटकांना दिलासा मिळाला आहे. ही गोष्ट आहे एका सिंगल मदरची. नातं तुटतं, पण आयुष्य थांबत नाही. नवऱ्याचा आधार गेला की, सगळं संपलं. पण खरं तर तेव्हाच तिच्या संघर्षाची कहाणी सुरू होते. तुटलेलं लग्न, अपयशी संसार आणि त्यावर समाजाचा एकटेपणाचा शिक्का हा प्रत्येक बाईसाठी शाप असतो. ती एकटी आहे, या दोन शब्दांतच तिचा संघर्ष सुरू होतो. तिचा संसारातील संघर्ष तिच्याच शब्दांत...
दिवस-रात्र राबून मुलांना शिकविले...
मी वरसोली-रामनाथ येथे राहते. 18 डिसेंबर 1984 रोजी माझे लग्न गणेश झाडेकर यांच्याशी झाले. आमचा संसार साधा, पण आनंदात चालला होता. मात्र, पतीचे अचानक निधन झाल्यानंतर माझ्यावर दोन मुलांची जबाबदारी आली. त्यावेळी मला कोणाचेही पाठबळ नव्हते; पण मुलांना घडवायचे मी ठरवले. मी घरात जेवण बनवून बँकांमध्ये डबे द्यायला सुरुवात केली. फुलांचे गजरे विकले आणि रात्री ट्रस्टमध्ये कामही केले. अशाप्रकारे मी संसार उभा केला. परिस्थिती खूप कठीण होती; पण मी हार मानली नाही. मुलांनीही कष्टाची जाणीव ठेवून शिक्षण पूर्ण केले. आज मोठा मुलगा मुंबईत इस्टेट एजंटकडे काम करतो आणि लहान मुलगा इंटरनेट सेवा देतो. शून्यातून उभे राहून आज आम्ही स्थिर आयुष्य जगतो, याचा मला अभिमान आहे.
एकल महिलेच्या संघर्षात तिचा श्वास संपला
मी 65 वर्षांची असून, अलिबाग तालुक्यातील भाल येथे राहते. माझे पती यशवंत पेडणेकर पायाच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितले होते; पण त्यासाठी लागणारे पैसे आमच्याकडे नव्हते. त्या काळात आमची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. आजही वाटते, जर त्यावेळी त्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे मिळाले असते, तर ते आज आमच्यात असते. पतींच्या निधनानंतर माझ्यावर मोठे संकट कोसळले. यातूनच मी भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. माझी मुलेही परिस्थिती समजून घेत होती. त्यांनी कधीही हट्ट केला नाही. जे मिळेल त्यात समाधान मानले. हळूहळू दिवस बदलायला लागले. मुलं मोठी झाली, त्यांनी आपापली जबाबदारी समजून घेतली. आता मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्यांतून मोकळी झाले आहे.
नवऱ्याच्या निधनानंतर व्यवसायाची कास धरली
माझे पती पंढरीनाथ साखरकर यांचे निधन झाले, तेव्हा मी अवघी 24 वर्षांची होते. त्यांच्या आजारपणावर योग्य उपचार करण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना वाचवू शकले नाही. त्यावेळी माझ्यावर मोठं संकट कोसळलं. मला स्वरूप नावाचा एक मुलगा आहे. त्याचं शिक्षण बारावीपर्यंत मी कष्ट करून पूर्ण केलं. घरात कुठलाही आर्थिक आधार नव्हता. त्यामुळे संसाराचा गाडा मला एकटीनेच ओढावा लागला. मी मासे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पहाटे उठून मुलासाठी जेवण बनवायचे. त्याला शाळेत सोडायची व नंतर बाजारात जाऊन मासे विकायची. अजूनही मी तेच काम करते. कधीकधी खूप खचून जायचे; पण माझ्या मुलाकडे पाहून पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळायचे. आई असल्यामुळेच आजपर्यंत संघर्ष करत उभी आहे.
मुलीला व्यावसायिक बनविण्यात यश
वैयक्तिक कारणांमुळे मला घटस्फोट घ्यावा लागला आणि त्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. त्या काळात परिस्थिती खूप कठीण होती. समाजात घटस्फोटित महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळाच होता. मला एकच मुलगी आहे आणि तिच्यातच मी माझे सगळे जग पाहत होते. मी नोकरी केली, घरातून साड्यांना बीडिंग करून दिले, कपडे शिवून दिले. कधीही कुणाकडे हात पसरले नाहीत. माझ्या कष्टाचे फळ हळूहळू मिळायला लागले. माझ्या मुलीने आपले शिक्षण पूर्ण केले. ती एका हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कामाला लागली. तिचे लग्नही लावून दिले. आज तिचा संसार खूप सुखाचा आहे आणि तिला एक गोंडस मुलगाही आहे. माझ्या मुलीचे स्वतःचे ब्युटी पार्लर आहे. ती स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी असल्याचा मला अभिमान वाटतो.

