Shahapur Taluka Tourism:. शहापूर तालुक्यात पर्यटन विकासाला वेग; ऐतिहासिक स्थळांच्या सुशोभीकरणातून निर्माण होतेय नवी ओळख Pudhari
ठाणे

Shahapur Taluka Tourism:. शहापूर तालुक्यात पर्यटन विकासाला वेग; ऐतिहासिक स्थळांच्या सुशोभीकरणातून निर्माण होतेय नवी ओळख

माहुली किल्ला, आजोबा पर्वत, जांभे धरण ते चेरवली मठपर्यंत दगडी बांधकामे व पायाभूत सुविधांवर कोट्यवधींची गुंतवणूक

पुढारी वृत्तसेवा

डोळखांब : दिनेश कांबळे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला याठिकाणी गर्भसंस्कार झाले. त्यामुळे तालुक्याची एक फार मोठी ऐतिहासिक ओळख आहे.

तालुक्यात आजोबा देवस्थान, टाकीपठार देवस्थान, फळेश्वर देवस्थान, भोमेश्वर देवस्थान यांसारखी पौराणिक तसेच ऐतिहासिक स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. तालुका हा दुर्गम व दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला असून याठिकाणी समृद्धी महामार्गासारखे शासनाचे वेगवेगळे प्रकल्प देखील कार्यरत आहेत. त्यामुळे एकीकडे जंगलांचे काँक्रीटीकरण होत असताना दुसरीकडे शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पर्यटन विकास कामामुळे तालुक्याची ऐतिहासिक ओळख देखील निर्माण होत आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्यटन विकासाकरिता अंदाजे दहा कोटी एवढी रक्कम खर्च झाली असून प्रत्येक पर्यटन स्थळाचे तालुक्याचे दृष्टीने वेगळे महत्व आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डोळखांब परिसरातील आजोबा देवस्थान याठिकाणी प्रभु रामचंद्र यांचे वास्तव्य होते. तसेच वाल्मिकी ऋषी यांची समाधी देखील आहे. तर लव-कुशाचा पाळणा, स्नानकुंड, ध्यान केंद्र तसेच धर्मशाळाहीआहे. यापैकी तालुक्यातील माहुली किल्ला ऐतिहासिक असून याठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आहे.

अशोका धबधबा येथे अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रिकरण झाले आहे. जांभे धरणाला वेगळे महत्व आहे. चेरपोली मठ म्हणजे ठाणे जिल्ह्यातील नाथ परंपरेचा प्रसार, प्रचाराचे केंद्र तसेच गादी म्हणून संबोधले जाते. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक विभागाने आणखी वेगळे महत्व निर्माण केले आहे. जिल्हा नियोजन समिती ठाणे यांच्याकडून तालुक्यातील विविध पर्यटन स्थळ घोषित आहेत. या स्थळांना पर्यटन क्षेत्रातील क दर्जा प्राप्त आहे. मागील 5 ते 6 वर्षांपासून सा.बां.विभागाकडून या पर्यटनस्थळी विशिष्ट पद्धतीने ऐतिहासिक दिसणारी विकासकामे केलेली आहेत. यामध्ये कुंदन धबधबा येथील दगडी घाट व कमानी पूल,

अशोका धबधबा येथील वैतारणा धरणावरील घाट व शिव मंदिर, माहुली किल्ला परिसरातील शिवसृष्टी व माहुली किल्ला प्रवेशद्वार, सपगाव येथील भातसा नदीकाठी असलेले शिवमंदिर, चेरवली येथील मठ, खरीड तलाव, आजोबा देवस्थान इत्यादी ठिकाणी यापूर्वी सुशोभीकरण व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. याच कामांमध्ये आता नव्याने भर टाकत चेरवली मठ मुख्य रस्त्यावर आकर्षक दगडी बांधकामामध्ये भव्य प्रवेशद्वारचे बांधकाम करण्यात आलेले आहे. याचबरोबर चेरवली नदीला लागून नवीन गणेश घाटाचे संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे. तसेच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले आजोबा पर्वत येथे वाल्मिकी ऋषीं मठावरील मंदिराचे नूतनीकरण प्रवेशद्वार व दगडी पायऱ्यांसह करण्यात आलेले आहे.

तालुक्यातील पावसाळ्यात प्रमुख आकर्षण असलेले जांभे धरण येथे दगडी घाट व उद्यानाचे काम करण्यात आले आहे व उर्वरित पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर सुरू आहेत. तसेच धसई येथील तलवाच्या दगडी बांधकामांमध्ये कमानी व घाट, संरक्षण भिंती बांधून सुशोभीकरण केले आहे.

तालुक्याची वेगळी ओळख निर्माण हेोतेय...

सदर कामे ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. 1 शहापूर यांच्याकडून उत्कृष्ट अभियंता म्हणून पुरस्कार प्राप्त केलेले अभियंता हर्षवर्धन भरत वाघ यांच्या संकल्पना व देखरेखीमध्ये अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे, उपाभियंता बळवंत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहेत. सदर कामाचे तालुक्यातून सर्व ठिकाणहून कौतुक केले जात आहे. तर तालुक्याला वेगळी ओळख देखील निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT