शहापूर : ग्रामीण भागात मर्यादित साधनसामग्री असतांनाही पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची जिद्द आणि आत्मविश्वास यांचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. तालुक्यातील धसई, शेलवली, कासगाव, फर्डेपाडा, शिलोत्तर आदी गावांमधील एकनाथ घरत, गणेश घरत, गौरव पवार, जय लकडे, विराज लकडे, अविनाश शिर्के, भूषण फर्डे, अंकुर भेरे, भूषण फर्डे, विजय फर्डे, प्रतीक फर्डे, आशिष फर्डे या तरुणांनी एकत्र येत.
श्रमदानातून धसई जवळील माळरानावर सरावासाठी मैदान तयार केले असून रोज सकाळ-संध्याकाळ ते कठोर प्रशिक्षण घेत आहेत.
माळरानावरील मोकळ्या जागेत सदर तरुणांनी श्रमदान करून धावपट्टी, व्यायामासाठी जागा आणि मूलभूत सुविधा तयार केल्या आहेत. कोणतीही आधुनिक साधने नसतांनाही त्यांनी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून सरावाची सोय निर्माण केली आहे. मैदानावर धावणे, लांब उडी, पुश-अप्स, स्टॅमिना ट्रेनिंग अशा विविध चाचण्यांचा सराव केला जातो. त्यांचा दिनक्रम शिस्तबद्ध असून सकाळी सर्व तरुण एकत्र येऊन वॉर्म-अपपासून सरावाला सुरुवात करतात.
त्यानंतर ठरावीक अंतर धावणे, वेगवर्धनाचे सराव, शारीरिक तंदुरुस्ती वाढवणारे व्यायाम घेतले जातात.संध्याकाळी पुन्हा एकत्र येऊन त्याची पुनरावृत्ती केली जाते. या उपक्रमामुळे परिसरातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या यशासाठी नागरिक आशावादी आहेत.