money Pudhari
ठाणे

SBI Talasari Fraud Case: तलासरीत महिला बचत गटांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

कर्मचाऱ्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल; 62 लाखांहून अधिक रक्कम परस्पर काढल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

तलासरी : सुरेश वळवी

तलासरीत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत कर्मचाऱ्यांनीच महिला बचत गटांच्या नावे परस्पर कर्ज घेऊन लाखोचा घोटाळा केल्याचे प्रकरण वर्षभरापूर्वी दैनिक पुढारीने उघडकीस आणले होते. दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल घेत याबाबत तत्कालीन शाखा व्यवस्थापक आणि इतर बँक कर्मचाऱ्यांची बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. अखेर वर्षभरानंतर स्टेट बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापक व इतर चार कर्मचाऱ्यांवर विद्यमान शाखा व्यवस्थापक नरेश सामंत यांच्याकडून तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलासरी तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेतून महिला बचत गटाच्या नावे परस्पर कर्ज काढून लाखोंचा घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केल्याने महिला बचत गटांनी याबाबत तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र स्टेट बँके ऑफ इंडिया तलासरी शाखेतून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने याबाबत दैनिक पुढारीत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तलासरी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक अमित कुमार आणि क्लार्क राहुल धनावडे यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र लाखोंचा घोटाळा होऊनही आर्थिक गुन्हे शाखा किंवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र वर्षभरानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया तलासरी शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अमित जनशिवराम कुमार, राहुल दत्तात्रय धनावडे (क्लार्क), उल्हास लक्ष्मण वळवी (सिक्युरिटी), चेतन जगदीश गोलीम (हाउसकीपिंग), नितेश राजू गवडा (हाउसकीपिंग) या पाच आरोपींवर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया तलासरी शाखेतून 16 बचत गट व 2 किसान क्रेडिट कार्ड संबंधित व्यक्तीच्या संमतीशिवाय खाती उघडून त्याच्यातून एकूण 62 लाख 65 हजार 478 रुपये स्वतःचा फायदा करता परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीअंती सदर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तलासरी पोलिस यासंबंधात अधिक तपास करीत आहेत.

बॅक कर्मचाऱ्यांच्या संमतीने असा झाला घोटाळा

1. तलासरी तालुक्यात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत तालुक्यातील विविध भागातील 65 आदिवासी महिला बचत गटांचे खाते आहे. यामध्ये एकूण 16 बचत गटांच्या नावे परस्पर कर्ज काढून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी साडेबासष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता.

2. जानेवारी 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत आपापसात संगनमत करून तलासरी तालुक्यातील महिला बचत गटाच्या नावे बोगस कागदपत्रांद्वारे, बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून 16 बचत गट व 2 किसान क्रेडिट कार्ड तसेच बचत गटाच्या खाती संबंधित व्यक्तीच्या संमतीशिवाय खाते उघडली.

3. आरोपींनी स्वतःच्या फायद्या करतात बचत गटाच्या खात्यातील रक्कम ही आपल्या स्वतःच्या अकाउंटला घेऊन त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. तसेच काही रक्कम ही यूपीआयचा वापर करून पैशाची देवाण-घेवाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT