

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड वाढली असून एका भटक्या कुत्र्याने एका शाळकरी मुलीचा अक्षरशः लचका तोडल्याचं समोर आले आहे. या प्रकाराने पालकवर्गात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षी तब्बल 7500 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असतानाही अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अंबरनाथ शहरात भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात अंदाजे आठ हजार पेक्षा जास्त भटके श्वान असल्याचा अंदाज अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने श्वान निर्बीजीकरण केंद्र देखील सुरू केले आहे. मात्र त्यानंतर देखील श्वानांची संख्या कमी झालेली दिसून येत नाही.
मंगळवारी सकाळी वांद्रापाडा परिसरात वंशिका नागर या सहावीतील विद्यार्थिनीने आपल्या 6 वर्षीय भावाला वाचवण्यासाठी धाडसाने भटक्या कुत्र्याला सामोरे गेली. या हल्ल्यात भटक्या कुत्र्याने वंशिका हिचा अक्षरशः लचका तोडला. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर पालिकेने या परिसरातून 18 भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीजीकरण केंद्रात नेले आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत नगरपालिकेत श्वान पकडणारे जाळे घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याच जाळ्यात पकडून श्वानांच्या केंद्रात सोडण्याची गरज असल्याचा संताप व्यक्त केला.
भटक्या कुत्र्यांसाठी शहरात 1200 पिंजरे असलेले दोन डॉग शेलटर होम तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी दोन जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
तेजश्री करंजुले- पाटील, नगराध्यक्षा