ठाणे

राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा सत्तेसाठीच : नारायण राणे

अमृता चौगुले

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा :  राहुल गांधी यांना आत्ताच भारत जोडोची आठवण का आली? राहूल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सत्तेसाठीच आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवर केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. तसेच खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांच्यावर देखील टीकेची झोड उठवली. डोंबिवलीत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाने निषेध केला आहे. इतकी वर्षे काँग्रेस देशामध्ये सत्तेत होती. मात्र, भारत जोडोची त्यांना आत्ताच आठवण आली का? यामध्ये ते स्वतःची यातायात करून घेत आहेत. भारत जोडण्यासाठी ते महाराष्ट्रात आले खरे मात्र महाराष्ट्रात नवीन कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले नाहीत, असे देखील ते म्‍हणाले. यात्रेदरम्‍यान तेच तेच चेहरे आजूबाजूला दिसत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सगळ्या पक्षाचे मिळून सध्या भारत जोडोची सुरूवात केली आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

या तीन पक्षाची मने जुळलेली नाहीत. सत्तेसाठी फक्त एकत्र येतात. यामध्ये त्यांना काही यश मिळणार नाही. जे कार्य सध्या पंतप्रधान मोदी करत आहेत ते प्रशंसा करण्यासारखे आहे. यामुळे भारताची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. जगात, असे कर्तृत्वत्वान नेते म्हणून त्यांचा गौरव होतो, यापेक्षा आणखी काय हवं, असे कौतुकास्पद उद्गार त्यांनी पंतप्रधान यांच्याबद्दल काढले.

आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना सावरकरांचा इतिहास माहित नाही 

आदित्य ठाकरे हे बालीश असून सावरकरांचा इतिहास त्यांना आणि त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांना राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे गांभीर्य कळले नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. सावरकरांचे देशासाठी योगदान खूप मोठं असून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते ते आदित्य ठाकरेंना माहिती नाही. हे फक्त त्या यात्रेत फोटो काढण्यासाठी गेले. त्यामुळेच त्यांना या वक्तव्याचे गांभीर्य नाही. त्यांना कोणतीही चीड आली नाही का? असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला.

नीलम गो-हे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी केला गौप्यस्फोट

नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले, नीलम ताई विसरल्या असतील पण माझ्या शिफारशी शिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या, असा गौप्यस्फोट केला. त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रीपद दिले नाही. त्यामुळे देखील ताई नाराज होत्या. मी सांगितल्यानंतर तरी ताईंना आठवेल अशी आशा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया ताई राजकाणात बदले पूर्वी घेतले जायचे – नारायण राणे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई यांनी सध्या महाराष्ट्रात बदला घेण्याचे राजकारण सुरू आहे, असे म्हटले होते. यावर बोलताना पूर्वी राजकारणात बदले घेतले जायचे पण दाखवले आणि सांगितले जायचे नाही. अगदी बुखारीपासून आत्तापर्यंत किती बळी गेले ते नावासकट हवं तर जाहीर करतो, असे ते म्‍हणाले. आम्ही सध्या विकास आणि कामाच्या जोरावर जिंकून येत, असा दावा राणे यांनी केला आहे.

मुंबई-गोवा चौपदरी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा चौपदरी रस्त्याचे काम राखडल्याने चक्रमान्यांची गैरसोय होत असून तो रस्ता केव्हा पूर्ण होईल, असा प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी सांगितले की, या महत्त्वाकांक्षी रस्त्याच्या कामाचा कंत्राटदार पळून गेल्याने काम थांबले होते. पण आता नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली असून लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कार्य तत्पर मंत्री असल्याने या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल असे सांगितले.

हे ही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT