पिंपरी : संथ गती दुरुस्तीमुळे मोरया गोसावी क्रीडांगण दोन वर्षांपासून बंद | पुढारी

पिंपरी : संथ गती दुरुस्तीमुळे मोरया गोसावी क्रीडांगण दोन वर्षांपासून बंद

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवडगाव येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मोरया गोसावी क्रीडांगण दुरुस्तीसाठी तब्बल दोन वर्षांपासून बंद आहे. क्रीडांगण नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, लहान मुले तसेच, खेळाडूंची गैरसोय होत आहे. हे दुरुस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे. त्यासाठी क्रीडांगण बंद ठेवण्यात आले आहे. जॉगिंग ट्रॅकचे काम रखडले आहे. मैदानात ठिकठिकाणी पेव्हिंग ब्लॉक व राडारोडा पडला आहे. मैदानातील स्वच्छतागृहाचे काम अर्धवट स्थितीत आहे. सीमा भिंत व त्यावरील लोखंडी जाळ्या तुटल्या आहेत.

दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. काम अर्धवट असतानादेखील या मैदानावर शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेदरम्यान मैदानावर खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
मैदानावरील दुरुस्तीचे कामे तातडीने पूर्ण करून ते सर्वांसाठी खुले करावे, अशी मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे यांनी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. अन्यथा तीव— आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button