ठाणे, पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहर अंमलीपदार्थमुक्त करण्याची विशेष मोहीम अंमलीपदार्थविरोधी विभागाने हाती घेतली आहे. या घाटकोपर व वरळी विभागाने चार तस्का-यांना बेड्या ठोकल्या. यामध्ये एका महिलेचा समावेश असून, या आरोपींकडून तब्बल ७५ लाख रुपयांचे चरस व २ लाख ६० हजार रुपयांचे एमडी जप्त केले आहे. या कारवायांमध्ये एकूण ७७ लाख ६० हजार रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अंमलीपदार्थ तस्करीत वाढ झाली आहे. विद्यार्थी व तरुणपिढीतील वाढते अंमलीपदार्थांचे सेवन लक्षात घेऊन तस्क-यांचे जाळे मुळापासून संपुष्टात आणण्याच्या सूचना पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अंमलीपदार्थविरोधी पथकांनी विशेष मोहीम राबवून तस्क-यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
वरळी व घाटकोपर अंमलीपदार्थविरोधी पथकांची शोधमोहीम सुरू असताना चरस व एमडीची तस्करी होणार असल्याची माहिती खब-यांकडून मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी गोवंडीतील बैंगणवाडी व धारावी परिसरात सापळा लावून वसीम नुरुज्जमा खान ऊर्फ वसीम पिला (३३), सोहील शमीम मोमेन ऊर्फ सोहेल कान्या, जुबेर सोहेब शेख ऊर्फ लादेन (४१) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ किलो ५०० ग्रॅम चरस आढळून आला. दरम्यान, धारावी परिसरात सापळा लावून वरळी अंमलीपदार्थविरोधी पथकाने आरती वसावा (२४) हिला ताब्यात घेतले. तिच्या पर्सची झडती घेतली असता त्यात २६ ग्रॅम एमडी आढळून आले.
हे ही वाचलं का