

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : चुकीच्या ठिकाणाहून गाडीने 'यू टर्न' घेतानाचा फोटो का घेतला, अशी विचारणा करीत गाडीत बसलेल्या तिघांनी ट्रॅफिक वॉर्डनला अरेरावी करीत, धक्काबुक्की करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी संबंधित तिघा जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी विवेक अशोक कौल (38 वर्षे, रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे), अशोककुमार श्रीकांत कौल (68, ता. चौरासी, सुरत, गुजरात) आणि विरेंद्र श्रीकांत कौल (65 वर्षे, रा. गुडगाव, हरियाणा) या तिघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करीत असलेल्या साबीर मज्जीद शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे.साबीर शेख हे रविवारी जयचंद चौक येथे कर्तव्यावर असताना सकाळी साडे अकराच्या सुमारास त्याठिकाणी पार्कींगमध्ये लावलेल्या एक कार क्र. (एमएच 12 एसवाय. 2012) चालकाने तेथून यू टर्न घेण्याची जागा नसताना देखील तेथून गाडी वळविण्यास सुरुवात केली.
त्यामुळे दोन्हीं बाजूंकडून येणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वार्डन शेख याने सदर कारचा फोटो काढला. यावर कार चालकाने गाडी रस्त्यात आडवी उभी करून वार्डन शेख यांना गाडीतून खाली उतरून, माझ्या गाडीचा फोटो का काढला, असे विचारले.
त्यावर शेख याने त्यास तुम्ही चुकीचे ठिकाणाहून गाडी वळवून घेतल्याने वाहतूककोंडी केल्याचे सांगितले असता, गाडी चालकाने शेख यांना अरेरावीची भाषा केली.
त्याचवेळी गाडीतील आणखी दोन वयस्कर व्यक्ती देखील गाडीतून उतरून शेख यांच्याजवळ आल्या. त्यानंतर गाडी चालकाने वार्डन शेख यांना हाताने धक्का देवून खाली पाडले आणि सोबतच्या दोन्ही व्यक्तींबरोबर शेख यांना लाथा बुक्याने मारहाण केली.
संबंधित तिघेजण वार्डन शेख यांना मारहाण करीत असल्याचे पाहून तेथे असलेले वाहतुक नियमन करणारे पोलिस हवालदार शिंदे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.
मात्र संबंधित तिघांनी शिंदे यांच्याशी देखील हुज्जत घालत त्यांना आरेरावीची भाषा वापरली. तेव्हा तेथे उपस्थित इतर नागरिकांनी संबंधित तिघांच्या तावडीतून वार्डन शेख यांना बाजूला घेतले. या मारहाणीत वार्डन शेख यांच्या डाव्या हाताचे कोपर्यावर जखम झाली आहे.
आकुर्डीत दीड लाखाची घरफोडी कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून एक लाख 48 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी येथे 29 नोव्हेंबर 2021 ते 4 फेब्रुवारी 2022 या कालावधीत घडली.
या प्रकरणी बालकृष्ण सीताराम गुप्ता यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दीड लाखाचा ऐवज लंपास प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी 1 लाख रुपये 53 हजारांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी (दि. 5) मोरया गोसावी बस थांबा ते चापेकर चौक या दरम्यान हा प्रकार घडला. प्रतिभा महाजन (रा. चिंचवड) यांनी फिर्याद केली आहे.