Success Story Makarand Narkar file photo
ठाणे

Success Story: डोंबिवलीच्या मकरंद नारकरची डिझाईन क्षेत्रात जागतिक भरारी; ‘फोर्ब्स’च्या ३० अंडर ३० ग्राउंड ब्रेकर्समध्ये निवड

Makarand Narkar: मकरंद नारकर हे मराठी नाव आज ग्राफिक डिझाईनच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर गाजत आहे. 'Apple' ते 'Nike' सारख्या दिग्गज कंपन्याही मकरंदच्या कलेच्या प्रेमात आहेत. वाचा थक्क करणारा प्रवास...

पुढारी वृत्तसेवा

Success Story Makarand Narkar

डोंबिवली : मकरंद नारकर हे मराठी नाव आज ग्राफिक डिझाईनच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर गाजत आहे. 'फोर्ब्स इंडिया'च्या २०२६ च्या '३० वर्षांखालील ३०' (30 Under 30) या प्रतिष्ठित यादीत मकरंद यांची निवड झाली आहे. डोंबिवलीसारख्या उपनगरातून सुरू झालेला हा प्रवास आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे.

सुरुवातीचा प्रवास आणि कौटुंबिक पाठिंबा

मूळचे डोंबिवलीचे रहिवासी असलेले मकरंद नारकर हे टिळकनगर विद्यामंदिर शाळेचे विद्यार्थी आहेत. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. दूरदर्शनवरील कार्टून्स पाहून त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. त्यांच्यातील हे नैसर्गिक कौशल्य ओळखून वडील आणि आईने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. ज्या काळात विद्यार्थी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्राकडे वळत होते, त्या काळात मकरंद यांच्या पालकांनी त्यांच्या कलागुणांवर विश्वास ठेवून त्यांना कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी डोंबिवलीतील उन्मेष इनामदार यांच्या ‘एक्सलंट आर्ट अकॅडमी’मध्ये चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले.

शैक्षणिक यश आणि सुवर्णपदक

चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण व त्यानंतर सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टच्या प्रवेशाची तयारी त्यांनी डोंबिवलीतील उन्मेष इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली केली. शालेय जीवनात एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट चित्रकला परीक्षांमध्ये मकरंद यांनी राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. त्यानंतर सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टच्या प्रवेश परीक्षेत उच्च स्थान मिळवून त्यांनी प्रवेश निश्चित केला. तेथेही आपली चमक कायम ठेवत त्यांनी जे. जे. मध्ये 'सुवर्णपदक' आणि मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. याच काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय डिझाइन क्षेत्राचा सखोल अभ्यास सुरू केला.

संकटाचे रूपांतर संधीत 'स्टुडिओ बूमरंग'ची स्थापना

पदवीनंतर काही काळ व्यावसायिक अनुभव घेतल्यावर, मकरंद यांना अमेरिकेतील जॉर्जिया येथील 'स्कॅड' (SCAD) युनिव्हर्सिटीमध्ये शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळाला होता. मात्र, कोविड-१९ मुळे त्यांना जाता आले नाही. या संकटाचे त्यांनी संधीत रूपांतर केले आणि २०२० मध्ये आपली सहकारी सोनल वसावे यांच्यासोबत डोंबिवलीत ‘स्टुडिओ बूमरंग’ची स्थापना केली. कालांतराने कामाचा व्याप वाढल्यामुळे हा स्टुडिओ मुंबईत हलवण्यात आला.

जागतिक ब्रँड्ससोबत काम

‘स्टुडिओ बूमरंग’ मार्फत मकरंद स्टारबक्स, नाईकी, अ‍ॅपल आणि कोका-कोला यांसारख्या जागतिक ब्रँड्सना डिझाईन सेवा पुरवत आहेत.

  • अ‍ॅपल: होळी व दिवाळीसाठी विशेष डिजिटल आर्टवर्क.

  • नाईकी: ‘Nike By You’ या जागतिक प्रकल्पासाठी काम.

  • कोल्डप्ले: २०२५ च्या 'म्युजिक ऑफ द स्फेअर्स' वर्ल्ड टूरसाठी व्हिज्युअल ओळख निर्माण केली, ज्यासाठी त्यांना 'क्युरियस ब्लू एलिफंट अवॉर्ड' मिळाला.

  • पॅरालिम्पिक २०२४: या स्पर्धेसाठी अ‍ॅनिमेशन व्हिडिओ तयार करणारे ते एकमेव भारतीय ठरले.

जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व

मकरंद यांनी लंडनमधील ‘Nicer Tuesdays’ या प्रतिष्ठित व्यासपीठावर आपले काम सादर केले आहे. तसेच ‘Global Young Guns’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४१ देशांतील ९८ फायनलिस्टमध्ये ते एकमेव भारतीय होते. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे 'गुगल डूडल' तयार करण्यापर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. सध्या ते लंडन आणि न्यूयॉर्कमधील ‘Jelly Illustration Agency’ मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत आहेत.

सांस्कृतिक नाळ आणि ओळख

मकरंद यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे ते जागतिक ब्रँड्ससाठी काम करताना त्यात भारतीय लोककथा, संस्कृती आणि परंपरा यांचा समकालीन डिझाइनशी सुरेख संगम साधतात. मातीशी नाळ जपून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणारे मकरंद नारकर यांचे यश आजच्या तरुण कलाकारांसाठी नक्कीच दिशादर्शक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT