

Birdev Done UPSC Success Story
बेळगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल मंगळवारी (दि. २२) दुपारी लागला. या निकालामध्ये यमगे (ता. कागल) येथील बिरदेव डोणे याने देशात ५५१ वी रँक पटकावत यश मिळवले. यूपीएससी क्रॅक करूनही बिरदेव निकालानंतर दोन दिवस बेळगाव, भवानीनगर येथील मंडोळी रोडच्या माळावर आपल्या मेंढरांच्या कळपासोबतच होता. गुरुवारी (दि. २४) तो सकाळी आपल्या मेंढरांच्या कळपाची जबाबदारी आपल्या नातेवाईकांकडे देऊन आपल्या गावी रवाना झाला.
निकालाआधी काही दिवसांपासून बिरदेव सीमा भागातील अनेक गावांच्या शिवारात आपली व आपल्या मामांची मेंढरे चारवण्यातच व्यस्त होता. खडतर परिश्रम, जिद्द चिकाटी, ध्येय ठेवून अभ्यासातील सातत्यामुळे युपीएससी क्रॅक करता येते, हे त्याने सिद्ध केले आहे.
बिरदेव डोणे यांने दहावी (९६ टक्के) आणि बारावी ( ८९ टक्के) परीक्षेत केंद्रात प्रथम येण्याबरोबरच पुणे येथून अभियांत्रिकीच्या स्थापत्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर दोन वर्षे दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दोन परीक्षाही त्यांने दिल्या. तिसऱ्या वेळी त्याला यश प्राप्त झाले. मध्यंतरीच्या कालावधीत गंगापूर (ता. भुदरगड) या ठिकाणी डाकसेवक म्हणूनही त्याने केवळ दहा महिने काम केले आहे.
यूपीएससी परीक्षेचा निकाल आहे, पण किती वाजता लागेल, याची माहिती नसणाऱ्या बिरूला त्याच्या मित्राने फोन करून, भावा तू जिंकलास, तुझं नाव लिस्ट मध्ये आहे, असा फोन केला, त्यावेळी बिरदेव बेळगाव जवळील मंडोळी रोडवरील माळावर आपल्या कळपातील बकऱ्यांच्या लोकर कात्रण कामांमध्ये व्यस्त होता.
आपल्याला यश मिळाले, याचा आनंद त्याला झाला, पण काम बाजूला ठेवता येत नव्हतं. काम आटोपल्या नंतर आपल्या नातेवाईकांना त्याने ही गोष्ट सांगितली. हजारावर बकऱ्यांचा कळप असणारे ठिकाण आनंद उत्सवाने न्हावून गेले. पोरानं कष्टाचं चीज केलं, अशी त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडून भावना व्यक्त होत होत्या.
निकालाबाबत बिरदेव याच्याशी संपर्क साधला असता तो म्हणाला, मला सहकार्य करणारे माझे आई, वडील, शिक्षक, मामा, नातलग यांच्यामुळेच मी हे यश सहज शक्य करू शकलो. मेंढपाळ हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. तो सांभाळणे गरजेचे आहे. आज पर्यंत आमचं कुटुंब यावरच अवलंबून आहे. माझं मेंढी माऊलीवर खूप प्रेम आहे. जिद्द चिकाटी असेल, तर मदतीचे अनेक हात पुढे येतात. मला माझे मित्र वनाधिकारी प्रांजल चोपडे आणि प्रशिक्षणार्थी आयएएस आशिष पाटील यांचे सहकार्य लाभले.