ठाणे : दिलीप शिंदे
मुंबईला अडीच वर्ष महापौरपद मिळावे याकरिता शिवसेनेचे दबावतंत्र सुरु होताच सेनेला स्पष्ट बहुमत असतानाही ठाणे भाजपने देखील महापौरपदाची चर्चा सुरु केली. दुसरीकडे कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेत स्वतंत्रपणे महापौर बनविण्याच्या हालचालींना वेग आले आहे. उल्हासनगरमध्ये वंचितच्या दोन नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने बहुमताचा जादुई आकडा शिंदे सेनेने गाठला असून कल्याणची सुभेदारी मिळविण्यासाठी सेना किंवा भाजपला ठाकरे बंधूंची मदत घ्यावी लागेल अन्यथा महापौरपद वाटून घ्यावे लागेल. त्यामुळेच विविध आमिषे, प्रलोभन देण्यास सुरुवात झाल्याने ठाकरे गटाच्या 11 नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे.
मुंबईत शिंदे सेनेचे नगरसेवक फुटू नये याकरिता त्यांना मुंबईत एकत्रित ठेवण्यात आले आहेत. अडीच वर्ष मुंबईचा महापौर शिवसेनेचा असावा, असा आग्रह सेना नेत्यांकडून धरला जात असल्याने नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही, हे लक्षात घेऊन डावपेच खेळले जात आहेत. 75 जागा जिंकून शिवसेनेने ठाण्यात एकहाती सत्ता मिळविलेली असतानाही 28 नगरसेवक असलेल्या भाजपने महापौरपदाची मागणी केली. प्रसंगी विरोधी बाकावर बसण्याचा इशारा दिला आहे.
कल्याण - डोंबिवली महापालिकेत नाईलाजास्तव शिवसेना- भाजप युती झाली आणि महायुतीचे 103 नगरसेवक जिंकून आले. 122 सदस्य संख्याबळ असलेल्या कल्याणात बहुमताचा आकडा 62 आहे. शिवसेनेचे 53 नगरसेवक तर भाजपचे 50 नगरसेवक जिंकले. सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेला 9 नगरसेवक तर भाजपला 12 नगरसेवकांची गरज आहे. त्यासाठी 16 नगरसेवक असलेल्या ठाकरे बंधूंची मदत दोन्ही पक्षांना घ्यावी लागेल. अन्यथा सत्तेची वाटणी अटळ आहे. मुंबईचा महापौर भाजपचा झाला तर कल्याणची सुभेदारी शिवसेनेला द्यावी लागेल, असे चित्र आहे.
उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपने स्थानिक पक्षांशी युती करून एकमेकांविरोधात निवडणूक लढविली. शिंदे - कलानी - इदनांनी गटाला 36 तर भाजपने 37 जागा जिंकल्या आहेत. महापालिकेत 78 जागा असून बहुमतासाठी 40 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे बहुमताचा जादुई आकडा गाठण्यास शिंदे सेना यशस्वी झाल्याचे दिसून येते. वंचित आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे सेनेला पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र दिले. तर दोन अपक्षांनी शिंदे सेनेला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भिवंडी महापालिकेच्या 90 जागा असून बहुमतासाठी 46 नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे मिळून 42 नगरसेवक असून समाजवादी पार्टीची मदत घेऊन महाविकास आघाडी सत्ता काबीज करू शकते. मात्र भिवंडीचा इतिहास पाहता काहीही घडू शकते. पुन्हा एकदा काँग्रेस फुटली तर 22 नगरसेवक असलेल्या भाजप सत्ता स्थापन करू शकते, त्यादृष्टीने हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. त्यामुळे चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडी आणि सहा नगरसेवक असलेले समाजवादी पार्टी ह्या गेमचेंजर ठरू शकतात.