Konkan Zilla Parishad Election Pudhari
ठाणे

Konkan Zilla Parishad Election: कोकणात शिवसेनेचे वर्चस्व कायम; जिल्हा परिषदेत नंबर 1 चे स्थान अबाधित

शिंदे गटाला 74 जागा, ठाकरे गटाला 10; भाजप 50 वर — कोकणच्या राजकारणात शिवसेना सरस

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोकणात नगरपालिका, महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही शिवसेनेने आपले नंबर 1 चे स्थान कायम ठेवले आहे. तीन जिल्हा परिषदांत मिळून 155 सदस्य निवडून येणार होते. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने जवळपास 74 जागा जिंकल्या आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेने 10 जागा जिंकल्याने दोन्ही शिवसेना मिळून 80 चा आकडा गाठला आहे. भाजपने जवळपास 50 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले आहेत. तर इतर पक्षांकडे 30 ते 35 जागा गेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नंबर 1 चे स्थान कायम राहिले आहे.

शिंदेंच्या शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 पैकी 13, तर रत्नागिरीत 56 पैकी 40, रायगडमध्ये 59 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. तर कोकणात एकूण 32 पंचायत समितींपैकी शिवसेनेने 12 पंचायत समिती मिळवल्या आहेत. तर भाजपने 7 पंचायत समिती मिळवल्या आहेत. महायुती म्हणून सर्वच पंचायत समित्यांवर सत्तेतील तीन पक्षांचे प्राबल्य आहे. यापूर्वी महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेने ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या तीन महापालिकांवर आपले महापौर बसविण्यात यश मिळवले होते. तर भाजपने मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर येथे महापौर बसवले होते. नगरपालिका निवडणुकीत सिंधुदुर्गात शिवसेना 2, तर भाजपने दोन ठिकाण्ाी यश मिळवले. रत्नागिरीत एकूण 9 नगरपंचायतींपैकी 80 टक्के नगरपालिकांत शिवसेनेचे वर्चस्व राहिले.

आमदारांच्या संख्येमध्ये एकूण 39 पैकी शिंदेंच्या शिवसेनेकडे 16 संख्याबळ आहे. तर भाजपकडे 15 संख्याबळ आहे. खासदारांच्या संख्येमध्ये शिवसेनेकडे 2, भाजपकडे 2, राष्ट्रवादीकडे 1 असे संख्याबळ आहे. एकूण कोकणच्या राजकीय आखाड्यात शिवसेना सरस असल्याचे पाहायला मिळत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये आमने सामने ठाकलेल्या शिवसेना राष्ट्रवादी या दोन पक्षामध्ये कडवी झुंज झाल्याचे पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणी भाजप तर काही उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबत युती करून निवडणूक लढवली. या युतीचे 22 उमेदवार विजयी झाले. तर शिवसेनेला 20 जागांवर विजय मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 59 जागा असून भाजपला 14 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे भाजप आता राष्ट्रवादी बरोबर जाणार की शिवसेनेबरोबर जाणार यावर सत्तेची समीकरणे ठरणार आहेत.

शिवसेनेला महाडमध्ये 6, पोलादपूरमध्ये 2, माणगाव 2, अलिबाग 6, खालापूर 1, रोहा 2, पेण 1 अशा 20 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी भाजपमध्ये रोहा 3, श्रीवर्धन 2, म्हसळा 2, कर्जत राष्ट्रवादी - उद्धव ठाकरे शिवसेना 6, खालापूर 2, उरण 2, अलिबाग 1, तळा 2, माणगाव 2 अशा 21 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला पनवेल 8, पेण 4, रोहा 1, खालापूर 1 अशा 14 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 30 जागांची गरज असून भाजप शिवसेनेच्या सदस्यांची संख्या 34 होते. तर राष्ट्रवादी भाजप यांची संख्या 35 होत आहे. त्यामुळेभाजपला दोघांपैकी एक मित्र सत्तेसाठी बरोबर घेणे शक्य आहे. त्यामुळे यापैकी कुठली गणिते जमणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले अशी जोरदार लढत पाहायला मिळाली. यामध्ये प्रतिष्ठेची माणगाव, निजामपूरची जागा शिवेसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या राजीव साबळेंमुळे प्रतिष्ठेची झाली होती. ही जागा शिवसेनेने जिंकली आहे. तर अलिबागमध्ये शेकापमधून भाजपमध्ये गेलेल्या आंबेपूर मतदारसंघातील चित्रा पाटील यांच्या मतदार संघात शिवसेनेने मुसंडी मारली आहे. कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही मोठा फटका बसला आहे. सहाही जागा राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांच्या युतीने जिंकल्याने शिंदेंच्या शिवसेनेची येथे पिछेहाट झाली आहे. नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी उद्धव ठाकरे युतीनेच विजय मिळवला होता. त्यानंतरचा हा दुसरा धक्का आहे. त्यामुळे या भागामध्ये राष्ट्रवादीची पकड मजबूत होताना दिसत आहे.

रायगडच्या पालकमंत्री पदावरूनही शिवसेना-राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच आहे. 15 ऑगस्टची झेंडावंदन राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी केले. तर 26 जानेवारीचे झेंडावंदन शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी केले. आजपर्यंत पालकमंत्री कुणाचा हे ठरलेले नाही. मात्र आता जिल्हा परिषदेला भाजप कुणाबरोबर जाणार यावर पालकमंत्री पदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

एकूण या निवडणुकीत सिंधुदुर्गात मंत्री असलेले नितेश राणे, आणि आमदार असलेले निलेश राणे, रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत, तर रायगडमध्ये सुनील तटकरे, भरत गोगावले अशा प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आपापले गड मंत्र्यांनी अबाधित राखल्याचे दिसत आहेत. याला अपवाद ठरले ते आमदार महेंद्र थोरवे.

भाजपसाठी हे नेते ठरले प्रभावी...

भाजपसाठी प्रदेशाध्यक्ष खा. नारायण राणे, रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे, आमदार प्रशांत ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, खासदार हेमंत सावरा, आ. संजय केळकर, आ. किसन कथोरे आतापर्यंत झालेल्या नगरपालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीत हे चेहरे प्रभावी ठरले आहेत. मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 पैकी 28 जागा जिंकत सिंधुदुर्गवर प्रभाव निर्माण केला आहे. यामध्ये खासदार नारायण राणे यांचा करिष्मा त्यांना उपयोगी ठरला. नगरपालिका निवडणुकीतही वेंगुर्ले, सावंतवाडी या नगरपालिका या भाजपने जिंकल्या आहेत. यातही नितेश राणेंचा वाटा होता. दुसऱ्या बाजूला रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये आ. प्रशांत ठाकूर यांनी भाजपला महापालिका तर जिंकून दिलीच आणि जिल्हा परिषदेत पनवेलच्या आठही जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच पनवेल पंचायत समितीही भाजपने जिंकली आहे. खा. धैर्यशील पाटील यांनी नगर पालिकेनंतर जिल्हा परिषदेतही पेण तालुक्यावर भाजपचे वर्चस्व मिळवून दिले आहे.ठाण्यात आ. संजय केळकर यांनी महापालिका निवडणुकीत भाजपचे 26 नगरसेवक निवडून आणण्यात मोठे योगदान दिले. तर आमदार किसन कथोरेंनी बदलापूर नगरपालिकेत विजय मिळवून दिला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीत 52 नगरसेवक निवडून आणून भाजपचा दबदबा निर्माण केला, तर खा. हेमंत सवरा यांनी पालघर जिल्ह्यात भाजपची घोडदौड सुरू ठेवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT