

मुंबई : गोवंडी आणि चेंबूरमधील एम पूर्व व एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2 वाजेपासून शुक्रवार 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांदरम्यान एम पूर्व विभागातील काही भागांतील (प्रभाग क्रमांक 146, 147 व 148) तसेच एम पश्चिम विभागातील काही भागांतील (प्रभाग क्रमांक 154 व 155) पाणीपुरवठा एकूण 30 तासांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.
एम पूर्व व एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी तुर्भे निम्नस्तरीय जलाशय येथे 1200 मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीवर 1200 मिलिमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्यात येणार आहे. तसेच, तुर्भे निम्नस्तरीय जलाशयास पाणीपुरवठा होणाऱ्या 1200 मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीचे टनेल शाफ्टला जोडणाऱ्या 1200 मिलिमीटर व्यासाच्या जलजोडणीचे काम केले जाणार आहे. यामुळे एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 3 दिवस पाणी उकळून प्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
एम पूर्व विभाग :
एच. पी. सी. एल. रिफायनरी, एच. पी. सी. एल. वसाहत, वरुण बेव्हरेजेस, बी. ए. आर. सी., गव्हाणपाडा, इंडियन ऑईल कंपनी लिमिटेड, बी. पी. सी. एल. वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ.
आर.सी.एफ. कॉलनी तसेच जुनी रिफायनरी क्षेत्र, भारत नगर, जे. प्लॉट, हशू अडवाणी नगर, आणिक गाव, एम. ए. सी. बी. वसाहत, सह्याद्रीनगर, आर. एन. ए. उद्यान, म्हाडा वसाहती, रॉकलाईन इमारती, विष्णू नगर, व्हिडिओकॉन इमारती, एस. जी. केमिकल इमारती, प्रयागनगर ओम-गणेश नगर, राहुल नगर, अशोक नगर
एम पश्चिम विभाग :
बीपीटी, टाटा, बी. पी. सी. एल., माहुल गाव, मरवली चर्च, माहुल एसआरए, फारुख गल्ली, खडी मशीन, आर. सी. मार्ग, सिंधी सोसायटी, एसआरए इमारती, वाशी नाका, अंबा पाडा, जिजामाता नगर, वित्तसंचयन, साईलीला रामटेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर कॅम्प, गणेश नगर, अशोक नगर, कोकण नगर, वाशीगाव, म्हाडा इमारती, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्मी नगर, मितुल एन्कलेव, म्हैसूर कॉलनी, एम. एस. इमारती, विजय नगर, आर. सी. मार्ग.