कल्याण : केडीएमसीत शिवेसना भाजप मनसेची सत्ता आहे. महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर महासभा कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आत्ता महासभेची तारीख 16 मार्चरोजी ठरली आहे. मात्र भाजपच्या एका मागणीने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजपने स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पद मागितले आहे. शिवसेना शिंदे गट भाजपच्या या मागणीवर विचार करणार का ? नाही केला तर भाजपची काय भूमिका असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
स्थायी समितीत आपले बहुमत असावे यासाठीच शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाचे तीन नगरसेवक फोडले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक शिवसेना भाजपने एकत्रित लढविली. निवडणूक संपल्यावर महापौर निवडणूकी आधी गट स्थापने दरम्यान शिवसेना शिंदे गट 53, मनसे 5 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक मिळून 59 सदस्यांचा गट स्थापन केला, भाजप आणि ठाकरे, कॉग्रेसने आपआपला गट स्थापन केला. ठाकरे गटाचे 11 पैकी तीन नगरसेवक अद्याप ठाकरे गटात सहभागी झालेले नाहीत. यावरुन दररोज चिंतन बैठक होत राहते. त्यातून काही निष्पन्न नाही.
महासभा झाली पाहिजे होती मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सामंजस्य नसल्याने ही महासभा देखील ताटकळत राहिली. आत्ता महासभेची तारीख ठरली आहे. स्थायी, महिला बाल कल्याण, शिक्षण समितीच्या सदस्यपदाची निवडणूक होणार आहे. याच दरम्यान, भाजप नेत्यांची एक बैठक कल्याणमध्ये आज पार पडली. या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील, केडीएमसीचे उपमहापौर राहूल दामले, गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक मंदार हळबे, माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यासह भाजप पदाधिकारी वैभव गायकवाड उपस्थित होते. या बैठकीत विविध समित्यावर कोणाची नियुक्ती केली जावी याची चर्चा झाली.
स्थायी समिती सभापती पद आणि सभागह नेते पद हे भाजपलादेण्यात यावे अशी मागणी भाजपने या बैठकीत केली आहे. या संदर्भात भाजपचे सर्व स्थानिक नेते रविंद्र चव्हाण यांची भेट घेणार आहे. केडीएमसीत महापौर शिंदे गटाकडे तर उपमहापौर पद भाजपकडे आहे. स्थायी समिती सभापती पद आणि सभागृह नेते पद हे भाजपला मिळावे ही भाजपची मागणी आहे .या मागणीचा शिंदे गट विचार करणार का हा प्रश्न आहे.
ठाकरे गटाचे तीन नगरसेवक ठाकरे गटात सहभागी झालेले नाही. या तीन नगरसेवकांना घेऊन स्थायी समितीत शिवसेना बहुमत आणणार म्हणजे सगळ्यात जास्त शिवसेनेचे असणार त्या परिस्थितीत सभापती शिवसेनाचा व्हायला पाहिजे, असे राजकिय जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.