कल्याण : सतीश तांबे
नुकत्याच पार पडलेल्या केडीएमसी निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुतीतील शिवसेना शिंदे गट व भाजप पक्षात महापौर पदासाठी लॉबिंगला सुरुवात झाली आहे. शिंदे सेनेचे 53 तर भाजपाचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी 62 चा जादुई आकडा गाढण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. विरोधी पक्षाचे निवडून आलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 11 तर मनसेचे 5 असे ठाकरे बंधू युतीचे 16 नगर सेवक गेमचेंजर ठरणार आहेत. शिवसेना शिंदे पक्षातून उमेदवारी न मिळालेले सहा सात नवनियुक्त नगरसेवक उबाठा व मनसे पक्षातून निवडून आल्याने त्यांची मनधरणी करून सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न केले जाणार आहेत,
तर मनसेचे निवडून आलेल्या नवनियुक्त नगरसेवक आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाचे प्रयत्न असणार आहेत. तर केडीएमसी निवडणुकीत महायुतीच्या शिंदे सेना व भाजपा जागा वाटपात महायुतीच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी महापौरपदासह अन्य महत्वाची पदे वाट्याला देण्यात येतील याचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र दोन्ही पक्षांना समसमान एखाद दोन, तीन जागा कमी जास्त प्रमाणात मिळाल्याने जागा वाटपाच्या वेळीच्या पदाच्या फॉर्म्युल्याला दोन्ही पक्ष जागणार की अन्य पक्षांना हाताशी धरून महापौर बसवणार या कडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
कल्याण-डोंबिवली शिवसेना, भाजपचे मिळून एकूण 103 नगरसेवक निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षाकडून महापौर पदावर दावा केला जात आहे. शिवसेनेचे 53 आणि भाजपचे 50 उमेदवार निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षांकडे महापौर पदासाठी काही चेहरे आहेत. महापौर पदाची आरक्षण सोडत झाली नाही. आरक्षण सोडतीनंतर सर्व काही निर्भर आहे. सोडतीनंतर महापैर पदाचा चेहरा ठरणार आहे. सध्या या दोन्ही पक्षांकडे इच्छूकांचा ओढा आहे.
ठाकरे गटातून निवडून आलेले मधूर म्हात्रे यांनी खासदार शिंदे यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने भुवया उचलल्या आहेत. तर काहींना शिंदे सेनेच्या जागा वाटपात त्यांच्या वाट्याला उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी उबाठा, मनसे पक्षातून उमेदवारी लढवून नशीब आजमावून निवडून आले आहेत. त्यांची मने वळवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे महापौर पदासाठी कोणत्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु आहे ही चर्चा महापालिकेत रंगली आहे. सध्या युती आहे. दोन्ही पक्ष महापौर पदासाठी प्रयत्न करीत आहेत. महापौर शिंदे गटाचा बसला तर तर कोण असणार या साठी काही नावे चर्चेत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची पहिली पालिका सार्वत्रिक पालिका निवडणूक 1995 साली झाली.
महापौर पदासाठी 1996 साली इतर मागास वर्गीय वर्गासाठी होते. 1996- 1997 , 1997 -1998 साली खुल्या वर्गासाठी होते. 1998-1999 साली महिला वर्गासाठी तर 1999-2000 साली खुल्या वर्गासाठी प्रत्येकी एका वर्षाचे होते. त्यानंतर महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षाचा झाल्याने 2000 नंतरच्या प्रत्येक अडीच वर्षाच्या कालावधीतील पहिल्या अडीच वर्षाचा कालावधीसाठी एससी महिला नंतरचे अडीच वर्षासाठी खुला वर्गासाठी आरक्षित होते. 2005 ते 2010 या कालावधीत पाहिल्या अडीच वर्ष खुल्या वर्गासाठी होते तर नंतरचे अडीच वर्ष एससी वर्गासाठी आरक्षित होते. 2010 ते 2015 या वर्षाच्या कालावधीत पाहिल्या अडीच वर्ष खुल्या वर्गासाठी होते तर नंतरचे अडीच वर्ष बीसीसी वर्गासाठी होते.
2015 ते 2020 या वर्षा कालावधीत पाहिल्या अडीच वर्ष खुल्या वर्गासाठी होते तर नंतरचे अडीच वर्ष महिला खुला वर्गासाठी होते. याच दरम्यान 2019 साली 2020 सालच्या निवडणूकीसाठी पहिल्या अडीज वर्षासाठी खुला वर्गासाठी आरक्षण जाहीर झाले होते. मात्र 2020 साला पासून 2025 साला पर्यंतच्या पाच वर्षात पालिका निवडणुका झाल्याच नसल्याने हे आरक्षण रद्द झाले असल्याचे चर्चिले जात आह. तसेच प्रथमच पॅनल पद्धतीने निवडणूक झाल्याने पुन्हा महापौर पदाचे आरक्षण काढले जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. केडीएमसीच्या इतिहासात एकदाही एसटी वर्गासाठी महापौर आरक्षण मिळाले नसल्याने या वर्गासाठी महापौर पदाची लॉटरी लागणार की नाही अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.