Kalyan Dombivli Municipal Corporation News
डोंबिवली : सुशिक्षित, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कलावंतांच्या डोंबिवली नगरीत गेल्या वीसपंचवीस वर्षांपासून अधिक काळ सामाजिक भावनेतून रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करणारे अध्यात्मिक क्षेत्रातील संत तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक प्रल्हाद म्हात्रे यांचा अनपेक्षितपणे पण धक्कादायक विजय झाला आहे.
ज्या भागात आपल्या समाजकार्याचा डोंगर उभा केला, त्याभागातील जनतेने मतपेटीच्या माध्यमातून प्रल्हाद म्हात्रेंना खांद्यावर घेतले. आपल्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगत असताना लेकीच्या निसटत्या पराभवाचे दुःख देखील ते जनताजनार्दनासमोर पचवू शकले नाहीत.
ठाकरे गट आणि मनसेची युती असली तरी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कल्याण-डोंबिवली शहरांकडे जाहीर सभा घेऊन किंवा अन्य काही कारणाने आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी फार मेहनत घेतली नाही. तथापी या पक्षांच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीत निवडणूक लढविणाऱ्या तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी आपण आपल्या प्रभागातच नव्हे तर सर्वत्र नागरी समस्या सोडविण्यासाठी केलेली कामे, करोना महासाथीच्या काळात लोकांनी केलेली मदत, या सर्व ताकदीचा विचारपूर्वक वापर करून केडीएमसी निवडणुकीत बाजी मारण्यात त्यांनी यश मिळविले आहे.
पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन सामाजिक कार्य करत असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची मदत न घेता प्रल्हाद म्हात्रे यांनी स्वखर्चातून पश्चिम डोंबिवलीच्या भागशाळा मैदानातील मातीच्या सुगंधाचे अस्तित्व टिकून ठेवण्यात, अर्थात अधोगतीला चाललेल्या डोंबिवलीच्या फुफ्फुसांना नवसंजीवनी देण्यासह खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, अबालवृद्धांसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.
गुंड-गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जाणारा बावनचाळ हा रेल्वे मैदानाचा परिसर, ठाकुर्ली उड्डाण पूल गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत प्रल्हाद म्हात्रे यांनी विविध प्रशासकीय, स्थानिकांच्या आव्हानाला तोंड देत विकसित केला आहे. शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सेवा, आदी अनेक सामाजिक कार्याचा डोंगर उभा करण्यात प्रल्हाद म्हात्रे नेहमीच आघाडीवर आहेत.
मधल्या काळात मनसेकडून त्यांनी फारकतही घेतली होती. केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने आर्जव केल्याने म्हात्रे यांनी मनसेकडून उमेदवारी स्वीकारली. केलेला विकास मतदारांसमोर असल्याने तळमळीचे कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे भरघोस मतांनी निवडून आले आणि त्यांना त्यांच्या चाहत्यांनी असे खांद्यावर उचलून घेतले.