सापाड : योगेश गोडे
कल्याण रिंगरुट मार्गामुळे वडवली परिसरात शेकडों एकर जमीन पाण्याखाली गेल्याने सुपीक जमीन नापीक झाल्याचे चित्र कल्याण ग्रामीण भागात उघडकीस आले आहे. परिणामी शेकडों शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वडवली परिसरातील शेतकऱ्यांवर उपासमारीची संकट ओढवले आहे.
शेतजमिनीसह ताडाची वृक्षाभोवती पाणी साचून ते कित्येक वृक्ष कोलमडून पडले आहेत. सोनं पिकवणाऱ्या जमिनीतून गटाराचे पाणी आणि विषाणू निर्माण होत असून स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न डोकं वर काढू लागला असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा आक्रोश उफाळू लागला आहे.
कल्याण शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी 2012 साली एमएमआरडीएच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून कल्याण रिंगरुट मार्गाला हिरव्या कंदील दाखवत भूसंपादनाचे आदेश देण्यात दिले. या अनुषंगाने रिंगरुट मार्गातील भूसंपादनासाठी पालिका आयुक्तांकडून युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली. महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंगरुट मार्ग मोठा खर्चिक प्रकल्प असल्यामुळे या प्रकल्पाचे सात टप्प्यात कामाचे विभाजन करण्यात आले.
डोंबिवली ते दुर्गाडी, दुर्गाडी ते गांधारी आणि गांधारी ते टिटवाळा आशा 30 किलोमीटरचा रस्त्यासाठी दीड हजार कोटीचा खर्च अपेक्षित होता. या रिंगरुट मार्गातील सात टप्प्यापैकी चौथ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात असून गांधारी ते वडवली मार्गातील काम देखील शेवटच्या टप्प्यात झाले आहे. मात्र हे काम होत असताना रिंगरुट मार्गामुळे वडवली गावातील सुपीक शेतजमिनीतून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ग्रामस्थांची शेकडों एकर शेतजमिनी पाण्याखाली राहू लागली आहे. परिणामी रिंगरुट मार्गातील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच उरला नसल्यामुळे पावसाचे पाणी सखल भागातील शेतांमध्ये साचू लागले आहे.
साचलेले पाणी जाण्यासाठी महापालिकेचे नियोजन नसल्यामुळे या सुपीक जमिनीत पाणी साचून ती जमीन नापीक बनत गेली आहे. त्यामुळे या परिसरातील शेकडों एकर जमीन पाण्याखाली राहून नापीक बनली आहे. या जमिनीत आत्ता कोणतेही पीक घेतले जात नसून पाणी साचून ही जमीनीला नाल्याचे स्वरूप आले आहे.
उंच भागातील पाणी, गटाराचे पाणी, लहान-सहान कंपन्यांचे पाणी या सखल भागातील शेतजमिनीत तुंबले जाऊन ही सुपीक जमीन नापीक झाल्यामुळे शेकडों गरीब शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वडवली परिसरातील शेकडों कुटुंबीय या जमिनीतून पिकवल्या जाणाऱ्या पिकावर आपला उदरनिर्वाह करत असायचे. मात्र या गावांमधून रिंगरुट मार्ग काढून स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच राहिला नसल्यामुळे ग्रामस्थांची शेकडों एकर जमीन गटार बनली आहे. त्यामुळे आज या जमिनीतून कोणतेही पीक उत्पादन केले जात नसल्यामुळे ही शेकडों एकर जमीन पडीत राहिली आहे. पूर्वी या जमिनीतून प्रामुख्याने भातशेतीचे उत्पादन केले जात होते. त्याचबरोबर भाजीपाला उत्पादन केला जात होता. मात्र रिंगरुटमुळे या जमिनीतून एकाही पिकाचे उत्पादन मिळत नसल्याची खंत पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.