Waste Management (File Photo)
ठाणे

Thane News | कल्याण-डोंबिवलीतील कचरा, स्वच्छतेचा प्रश्न निकाली निघणार

Waste Management | महाराष्ट्रात प्रथमच चेन्नई पॅटर्नद्वारे स्वच्छता

पुढारी वृत्तसेवा

Waste Management

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीकरांना गेल्या अनेक वर्षापासून भेडसावणाऱ्या कचऱ्याचे निर्मूलन आणि शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने चेन्नई पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम, तर चेन्नईनंतर देशातील दुसरा उपक्रम असणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या रविवारी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

चेन्नई केवळ भारतातील नव्हे तर जगातील लंडननंतरची सर्वात जुनी महानगरपालिका मानली जाते. कल्याण-डोंबिवलीपेक्षा किती तरी पट अधिक क्षेत्रफळ आणि जवळपास तिप्पटीने लोकसंख्या असणारे चेत्रई हे मेट्रोपॉलिटन शहर आहे. कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच कमी जागेत घनदाट लोकसंख्या असल्याने काही वर्षांपूर्वीपर्यंत इकडेही कचऱ्याच्या समस्येने नागरिक आणि महापालिका प्रशासन हैराण झाले होते. मात्र साधारणतः जानेवारी २०२० अर्थात कोवीड महामारीच्या काळापासून चेन्नईने कचरा निर्मूलन आणि स्वच्छतेसाठी यशस्वीपणे राबवलेल्या अनोख्या कचरामुक्त शहर उपक्रमाचे देशभर कौतुक करण्यात येत आहे.

चेन्नई महानगरपालिकेने उरवेसर सुमीत या जागतिक कीर्तीप्राप्त संस्थेच्या माध्यमातून चेन्नई शहराचा कचरा आणि शहर स्वच्छतेमध्ये शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. विशेष म्हणजे चेन्नईतील नागरिकांनीही या अनोख्या उपक्रमाला तितक्याच सकारात्मकपणे प्रतिसाद दिल्यानेच गेल्या चार वर्षांत या उपक्रमाने शहर स्वच्छतेमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता हाच शहर स्वच्छतेचा चेत्रई पॅटर्न कल्याण-डोंबिवलीमध्ये राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरम्यान चेन्नईच्या धर्तीवर सुरू होणाऱ्या या महाराष्ट्रातील पहिल्या कचरामुक्त शहर उपक्रमालाही चेन्नईप्रमाणे कल्याण-डोंबिवलीकरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला आहे.

तक्रारी विनाविलंब सोडवण्यासाठी अॅप

दिवसातील २४ तास ३ शिफ्टमध्ये हे काम चालणार असून प्रत्येक घराबाहेरील कचरा उचलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतकेच नाही तर यासोबतच शहरातील मुख्य असो की अंतर्गत रस्त्यांच्या परिणामकारक स्वच्छतेसाठी कुशल मनुष्यबळासह पॉवर स्वीपर मशीनचाही समावेश असणार आहे. नागरिकांच्या कचऱ्या संदर्भातील तक्रारींसाठी विशेष अॅप बनवण्यात येणार असून या अॅपसोबतच समाज माध्यमांव्यातिरिक फोनद्वारे येणाऱ्या तक्रारी विनाविलंब सोडवण्यासाठी आयसीसीसीचीही निर्मिती करण्यात आली आहे.

ठेकेदाराला दंडात्मक कारवाईची तरतूदही

यासाठी पहिल्या टप्प्यात कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या डी, इ, एफ, जी, एच, आय आणि जे या ७ प्रभागांची निवड करण्यात आली आहे. या सातही प्रभागांमध्ये कचरा संकलन वाहतूक आणि रस्ते सफाईचे अतिशय सूक्ष्म पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातही यापूर्वी किती कचरा उचलला जायचा त्याच्या वजनावर संबधित संस्थेला देयक दिले जायचे. मात्र या नविन संकल्पनेनुसार केडीएमसी प्रशासनाकडून यासाठी तब्बल ४५ नॉर्मस् (निकष) बनवण्यात आले आहेत. हे सर्व नॉर्मस आणि की परफॉर्मन्स इंडिकेटर तपासूनच या कामाचे देयक दिले जाणार आहे. त्यांची पूर्तता न झाल्यास संस्थेवर दंडात्मक कारवाईची तरतूदही महापालिकेकडून करण्यात आली आहे. या उपक्रमातील सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT