

डोंबिवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांन्वये १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम दिनांक ७ जानेवारी ते १६ एप्रिल या कालावधीत ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्तालयात राबविण्यात आली होती.
पोलिस परिमंडळ ३ हद्दीत पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह चौघा अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याला साजेशी कामगिरी केल्याने या चारही अधिकाऱ्यांचा पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याहस्ते सन्मानपत्राद्वारे गौरव करण्यात आला.
हा समारंभ ठाण्यातील सभागृहात गुरूवारी पार पडला. उपायुक्त कार्यालय स्तरावर परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल उत्तमराव झेंडे यांनी पहिला क्रमांक पटकावला. सहाय्यक पोलिस आयुक्त स्तरावर डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पोलिस ठाण्याच्या स्तरावर मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पराक्रमांची शिकस्त केली आहे. त्याचे फलित म्हणून डीसीपी अतुल झेंडे हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याहस्ते सन्मानपत्राद्वारे त्यांचा गौरव करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांत अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात ५० गुन्हे नोंदवून ६५ तस्करांना तुरूंगाचा रस्ता दाखवला आहे. चरस, गांजा, एमडी, कोडीनयुक्त औषधाच्या बाटल्या असे ३० लाखांचे अंमली पदार्थ जप्त करून डीसीपी अतुल झेंडे यांनी नशेच्या आहारी गेलेल्या तरूणाईला बाहेर काढले आहे. अंमली पदार्थ विरोधी खास पथक तयार करून डीसीपी झेंडे यांनी गुन्हेगारांची धरपकड करत नशेचे अड्डे उध्वस्त केले आहेत. या मोहिमेला डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने, आदी बहाद्दर अधिकाऱ्यांची साथ मिळाल्याने डीसीपी अतुल झेंडे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. गौरवमूर्ती अधिकाऱ्यांचे कल्याण-डोबिवलीकरांकडून कौतुक करण्यात येत आहे.