ठाणे; पुढारी वृत्तसेवा : "कळवा रुग्णालय प्रकरणात जे खुनी आहेत त्यांच्याच हाती चौकशी समिती दिली आहे. त्यामुळे चौकशी काय होणार हे यातून दिसत आहे. या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल तर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करून त्यांच्या समितीमार्फत करावी," अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शहर सौंदर्यीकरणावर करोडो रूपयांचा खर्च केला जात आहे. मुख्यमंत्री ग्लोबलचे स्वप्न दाखवत आहेत. मात्र इकडे लोकांचे जीव जात असताना त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम सरकार करत असून महाराष्ट्रात सत्तेच्या साठमारीत जनतेचा जीव धोक्यात आला आहे," असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, कळवा रुग्णालय म्हणजे भ्रष्टाचारांचा अड्डा आहे. या ठिकाणी डॉक्टर नर्सेस यांची कमतरता आहे. तसेच सुविधांचा देखील अभाव आहे. त्यामुळे हे रुग्णालय महापालिकेला चालवायला येत नसेल तर त्यांनी शासनाकडे द्यावे. लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असून राज्यात सत्तेची साठमारी सुरू आहे. केवळ आपल्या मर्जीतल्या लोकांना ठेका मिळावा यासाठीच कळवा रुग्णालय सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
कळवा रुग्णालयात स्वच्छता न करता केवळ बिले काढली जात आहेत. रुग्णालयात जुनीच यंत्रणा कार्यान्वित असून अत्याधुनिक यंत्रणांचा अभाव आहे. मुख्यमंत्री ठाणेकरांना ग्लोबल हॉस्पिटलची स्वप्न दाखवतात मात्र कळवा हॉस्पिटलकडे पाहिल्यास ते येथील रुग्णांच्या आरोग्याशी खेळतात की काय असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेचा बट्याबोळ झाला असल्याच त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. तर कळवा रुग्णालयातही अनेक पद रिक्त आहेत असं असताना राज्यातील गडचिरोली असेल किंवा इतर ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज सुरू करून काय होणार, असा सवालही त्यांनी केला. कळवा हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये रुग्ण गंभीर अवस्थेत असताना त्या ठिकाणी सिनियर डॉक्टर न जाता ज्युनियर डॉक्टर तपासणीसाठी जात आहेत हे गंभीर असल्याचेही ते म्हणाले.
या घटनेत मृत पावलेल्यांना किमान दहा लाखांची मदत तात्काळ दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. चौकशीच्या नावाखाली आरोग्य संचालकांना सुट्टीवर धाडले आहे. मात्र या प्रकरणात दोषी असणाऱ्या आरोग्यमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना घरी बसवले पाहिजे. दुखणे कुठे आणि कारवाई कुठे हे सगळेच हास्यास्पद आहे. कळवा रुग्णालयांच्या डीनला कारभार झेपत नसल्याचे दिसत असून त्यांच्या जागी नवीन डीनची नियुक्ती करावी. या संपूर्ण प्रकरणाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :