राजगुरूनगर : तीन माजी सरपंच आणि तीन ग्रामसेवकांवर फसवणुकीचा गुन्हा | पुढारी

राजगुरूनगर : तीन माजी सरपंच आणि तीन ग्रामसेवकांवर फसवणुकीचा गुन्हा

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील गुळाणी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार तसेच ग्रामपंचायत दप्तरी झालेल्या नोंद बदलुन अभिलेख गहाळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या संगनमताने फसवणुक प्रकरणी तब्बल तीन माजी सरपंच आणि तीन ग्रामसेवकांवर खेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि तपासा अंती आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी याबाबत विचारता दिली.

गुळाणी ग्रामपंचायतीत सन २००४ ते २०१९ या कालावधीत हा गुन्हा घडल्याचा आरोप ग्रामस्थ अँड. ज्ञानेश्र्वर रोडे यांनी केला होता.मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाला मिळालेल्या न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सोमनाथ कारंडे यांनी सोमवारी (दि १४) खेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून खेड पोलिसांनी माजी सरपंच दिलिप ढेरंगे,त्यांच्या पत्नी माजी सरपंच कुंदा ढेरंगे, माजी सरपंच बाळासाहेब सुतार तसेच ग्रामसेवक मनीषा वळसे, एस. टी. जोशी आणि अनिता आमराळे यांच्या विरोधात एकुण ८ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अँड. रोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या अपहार, भ्रष्टाचार व नोंदी बदलण्याची, बनावट नोंदी केल्याची माहिती दिली.त्यात सरपंच, ग्रामसेवक यांनी अपहार केलेली ४७ हजार ३०७ रुपये रक्कम शासनाला परत केल्याचे सांगीतले. याशिवाय गुळाणी गावात होणाऱ्या एका ५० लाख रुपये निधीच्या पाणी पुरवठा योजनेत पाण्याची टाकी, जलवाहिनी न करता पैसे लाटल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेत शिंदे सेनेचे जिल्हाअध्यक्ष, खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, माजी तालुका अध्यक्ष प्रकाश वाडेकर , ज्ञानेश्र्वर ढेरंगे, नरेंद्र वाळुंज, संदीप पिंगळे, माऊली पिंगळे आदी उपस्थित होते. प्रतिक्रियेसाठी कायदेशीरदृष्ट्या माजी सरपंच दिलीप ढेरंगे यांना अनेकदा संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

बांधकाम अभियंता शिंदे यांचे काय झाले?

गुळाणी लगत असलेल्या वाकळवाडी गावात कोणत्याही प्रकारचे काम न करता एका समाज मंदिराचा पुर्ण निधी ठेकेदाराला देण्यात आला होता.यावर तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप होऊन टोकाचे वादंग निर्माण झाले होते.पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अभियंता शिंदे यांनी आत्महत्या केली होती.यावरून मोठी खळबळ उडाली होती. न्याय देण्यासाठी आणखी एखादी आत्महत्या व्हायची वाट प्रशासन पाहात आहे का? असा प्रश्न अँड. ज्ञानेश्र्वर रोडे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

हेही वाचा :

Sanjay Raut : शरद पवार आमचे नेते म्हणणं अजित पवार गटाच ढोंग : संजय राऊत

Ajit pawar Shirdi : महामानवांच्याबाबत बेताल वक्तव्य सहन करणार नाही; अजित पवार

Back to top button