Illegal Sperm Bank Virar Pudhari
ठाणे

Illegal Sperm Bank Virar: विरारमध्ये बेकायदा ‘स्पर्म बँक’चा भंडाफोड; ४५ वीर्यनमुने जप्त

महानगरपालिकेच्या कारवाईत दोन जणांविरुद्ध गुन्हा; एआरटी कायद्याचे उल्लंघन उघड

पुढारी वृत्तसेवा

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने विरार (पूर्व) येथे कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरले जाणारे दात्यांचे वीर्यनमुने अवैधरित्या साठवून त्यांची विक्री करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम २०२१ तसेच सरोगसी (नियमन) अधिनियम २०२१ या कायद्यांची अंमलबजावणी केली जाते. या विभागाला मिळालेल्या माहितीनुसार विरार (पूर्व) येथील पद्मीबाई टॉवर, एन. पी. रोड, सबवे समोर असलेल्या ‘जीवदानी सायंटिफिक कंपनी’ येथे अवैधरित्या गॅमेट्सची विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त (वैद्यकीय आरोग्य) तसेच उपायुक्त (वैद्यकीय आरोग्य) यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी तपासणीसाठी वैद्यकीय पथकाची नियुक्ती केली.

दि. ९ मार्च २०२६ रोजी वैद्यकीय पथकाने संबंधित ठिकाणी तपासणी केली असता ‘जीवदानी सायंटिफिक कंपनी’ ही एजन्सी मयूर भागवत संखे आणि कमलेश शंकर खुत यांच्या मालकीची असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान एका क्रायोजेनिक कंटेनरमध्ये दात्यांचे वीर्यनमुने अवैधरित्या साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. या कंटेनरमध्ये कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरले जाणारे एकूण ४५ वीर्यनमुने (स्पर्म व्हायल्स) आढळून आले.

डॉक्टरांच्या मागणीनुसार पुरवठा

प्राथमिक चौकशीत डॉक्टर, रुग्णालये किंवा एजंट यांच्याकडून दूरध्वनीवर मागणी आल्यानंतर संबंधितांना या एजन्सीमार्फत वीर्यनमुने पुरवले जात असल्याची माहिती समोर आली. संबंधित ठिकाण सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम २०२१ अंतर्गत एआरटी बँक म्हणून नोंदणीकृत नसल्याचेही आढळून आले. तसेच संबंधितांकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता नसतानाही वीर्यनमुने साठवून त्यांचा अवैध व्यापार केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणी विरार (पूर्व) येथील विरार पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT