

रायगड : पारंपरिक पद्धतीने मसाले बनवताना ते भाजण्यासाठी गॅस किंवा चुलीचा वापर केला जातो, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन होते. मात्र, निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या अलिबाग तालुक्यातील चौल येथील शैलेश राईलकर यांनी सौर ऊर्जेचा वापर करून
मिरची वाळवण्याचा आणि त्यापासून लाल तिखट बनवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडर्सचा देखील तुटवडा असताना सौर उर्जा वापर करणे प्रभावी ठरु शकते.
कोकणात घरांवर पत्र्यांची छप्परे मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या छपराखालील माळा नैसर्गिक सौरवाळवणी यंत्रासारखे काम करू शकतो, हे राईलकर यांनी विचारात घेवून दुपारी तापलेल्या पत्र्याखाली एका जाळीच्या ट्रेमध्ये मिरच्या ठेवल्या. कोणत्याही अतिरिक्त इंधनाशिवाय केवळ दोन दिवसांत या मिरच्या कडक वाळल्या आणि त्यापासून दर्जेदार मिरची पावडर तयार करण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाचे काम प्रत्येकाच्या हातात आहे. आपण आपल्या दैनंदिन कामात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा आणि नैसर्गिक उष्णतेचा वापर केला, तर पर्यावरणाचे रक्षण करणे सोपे होईल. तापलेले पत्रे हे ऊर्जेचा उत्तम स्रोत ठरू शकतात.
शैलेश राईलकर, पर्यावरण स्नेही, चौल