डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकावर खुल्लमखुल्ला प्रेम चाळे करणाऱ्या तरूण-तरूणीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. प्रेम करताना सार्वजनिक ठिकाणी देहभान विसरणाऱ्या त्या प्रेमीयुगलावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी (दि.७) दुपारी डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकावर थांबलेल्या प्रेमीयुगुलांना कसलेच भान राहिले नव्हते. सार्वजनिक ठिकाणी त्यांना तरूण-तरूणीचा रोमान्स पाहून ये-जा करणाऱ्या आणि तेथे थांबलेल्या प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या. काही केल्या तरुण-तरुणीचे अश्लील चाळे थांबत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या काही प्रवाश्यांपैकी एकाने हा रोमान्स आपल्या मोबाईलमधील कॅमेरात कैद तर केलाच. शिवाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या डोंबिवलीत आता असलेही प्रकार खुल्लमखुल्ला होत असल्याने एकीकडे डोंबिवलीकरांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तर दुसरीकडे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर आंबटशौकीन नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
अखेर डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी या प्रेमीयुगलावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांना विचारले असता ते म्हणाले, व्हिडिओत दिसणाऱ्या त्या प्रेमीयुगलांचा शोध सुरू आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरात अश्या प्रकारे कुणी अनैतिक वर्तन केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असाही इशारा ढगे यांनी दिला आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : विधानसभा निवडणूक : भाजपाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव नेमका कशामुळे