ममता बॅनर्जी : ‘केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने भाजपने मिळवला विजय’ | पुढारी

ममता बॅनर्जी : 'केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने भाजपने मिळवला विजय'

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशसह विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रभावी विजयावर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी साशंकता व्यक्त केली आहे. ममता म्हणाल्या, की हा लोकप्रिय जनादेश नसून ‘निवडणूक यंत्रणा, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने मिळवलेला विजय आहे. कोलकाता येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, निवडणूक आणि केंद्रीय यंत्रणा आणि संस्थांचा वापर करून ते जिंकले आहेत.

तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी ( mamata banerjee ) म्हणाल्या, ‘तुम्ही म्हणाल की यूपीमध्ये भाजपचा विजय झाला आहे. परंतु, जर तुम्ही अचूक गणना केली तर अखिलेश (यादव) यांच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. अखिलेशच्या जागा वाढल्या असून भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या होत्या. वाराणसीचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. अखिलेश यादव यांचा पराभव झाला आहे. अखिलेश यांनी निराश होऊ नये, त्यांनी लोकांमध्ये जाऊन ईव्हीएमच्या फॉरेन्सिक अभ्यासाची मागणी केली पाहिजे. त्यांना लोकप्रिय जनादेश नाही तर यंत्रणांचा जनादेश मिळाला आहे.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 जागांपैकी भाजपने 273 जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाच्या खात्यात 125 जागा आल्या आहेत. याचा अर्थ सपापेक्षा भाजपने दुपटीहून अधिक जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीत काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत, तर मायावतींच्या बसपाला केवळ एक जागा मिळाली आहे. इतरांच्या खात्यात दोन जागा आल्या आहेत.

काँग्रेसने तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन व्हावे

४ राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या एका नेत्याने चक्क काँग्रेसला टीएमसी (TMC)मध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री फरहाद हकीम यांनी राष्ट्रीय काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेससारख्या जुन्या पक्षाला पाच राज्यांच्या निवडणुकीत दारुण पराभवाला कसे काय सामोरे जावे लागते, हे मला समजत नाही. एकेकाळी मी सुद्धा या पक्षाचा भाग होतो. सततच्या पराभवानंतर काँग्रेस आता स्वत:च्या पायावर उभी राहून भाजपशी स्पर्धा करू शकत नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने तृणमूल काँग्रेसमध्ये सामील व्हावे. काँग्रेसचे टीएमसीमध्ये विलीनीकरण करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांचे ‘तृणमूल’मध्ये विलीनीकरण झाल्यास राष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या तत्त्वांचे अनुकरण करून आपण गोडसेंच्या तत्त्वांविरुद्ध लढू शकतो.

Back to top button