डोंबिवली : भाग्यश्री प्रधान आचार्य
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे १ डिसेंबर पासून सुरू करण्यात येणाऱ्या शाळांना स्थगिती दिलेली आहे. तरीही डोंबिवलीतील सागाव येथील नंदादीप ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पालकांच्या परवानगीने ही शाळा सुरू केल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. (Dombivli School)
जवळपास गेल्या दोन वर्षांपासून ऑफलाईन पद्धतीने बंद असणाऱ्या शाळा १ डिसेंबर पासून सुरू करायचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा एक बाधित रुग्ण डोंबिवलीत सापडल्याने एकच खळबळ माजली. परिणामी ठाणे जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देत, शाळा १५ डिसेंबरला सुरू होतील अशी माहिती दिली होती.
असे असले तरीही नांदीवली पाडा सागाव येथील नंदादीप प्राथमिक शाळा मात्र सुरू असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे या शाळेतून मुलांच्या अभ्यासाचा आवाज ये जा करणाऱ्या नागरिकांना ऐकू येत असल्याने शाळा पुन्हा कधी सुरू झाल्या ? असा प्रश्न त्यांना नागरिकांना पडला आहे. (Dombivli School)
ही शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेची कोणतीही परवानगी न घेता शाळा सुरू केल्याने सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांनी कोरोना नियमांचे पालन केले नसल्याचे दिसून येत आहे. तर शाळेच्या एका वर्गात शिक्षकही शिकवायला नसल्याचे दिसून आले. शिक्षकांचा हेतू जरी चांगला असला तरी नियमांची पायमल्ली करत शाळा सुरू का केली गेली ?, विद्यार्थांना कोरोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारले असता, विद्यार्थी कंटाळले असल्याने आणि पालकांनीही आग्रह केल्यानेच शाळा कोरोना नियमाप्रमाणे सुरू केल्याचे सांगितले.
४ ऑक्टोबर रोजी एक शासन नियम आला होता. शाळा संस्थापक आणि व्यवस्थापक आजूबाजूची परिस्थिती जाणून आणि पालकांची परवानगी घेऊन शाळा सुरू करू शकतात असा हा नियम आहे.
– सुनिता मोटेघरे, गटविकास अधिकारी
हेही वाचा