ठाणे

डोंबिवली: पत्नीच्या आजाराचे कारण सांगत बनावट सोने देऊन लाखोंचा गंडा घालणाऱ्यास अटक

अविनाश सुतार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : आजारी पत्नीच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून बनावट सोने देऊन डोंबिवलीकरांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका भामट्याला डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले. भीमा सोळंकी असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याचा साथीदार राजू उर्फ कालीया सोळंकी पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दोघांनी अशा पद्धतीने अनेक जणांची फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस आपल्या मार्गावर असल्याची माहिती मिळताच भीमा हा वारंवार सिम कार्ड बदलत होता. मात्र, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी, डोंबिवली पूर्व आजदे गावात राहणाऱ्या गृहस्थाला भीमा व त्याचा साथीदार कालिया याने पत्नी आजारी असून पैश्यांची गरज असल्याची विनवणी केली. शेतात मला सोन्याचे क्वाईन सापडले आहेत, ते तुम्हाला देतो. मला पैसे द्या, अशी विनवणी करत आमिष दाखवून बनावट सोने तक्रारदाराला दिले. त्यांच्याकडून २ लाख रुपये उकळले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने रामनगर पोलीस ठाण्यात तशी फिर्याद केली. पोलिसांनी फरार भामट्यांचा शोध सुरू केला.

दरम्यान भीमा सोळंकी याला कुणकुण लागल्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमधील तब्बल २५ सिमकार्ड बदलले. मात्र, भीमा हा विठ्ठलवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विठ्ठलवाडीमध्ये सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या. परंतु त्याचा साथीदार कालिया पसार झाला. या दोघा भामट्यांनी अशा पद्धतीने आणखी काही जणांना लुबाडल्याचा संशय आहे. पोलिसांना त्या दृष्टीने तपास करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT