Children Fatty liver danger | लठ्ठपणाच नव्हे, मुलांच्या यकृतातील चरबीही धोक्याची घंटा File photo
ठाणे

Children Fatty liver danger | लठ्ठपणाच नव्हे, मुलांच्या यकृतातील चरबीही धोक्याची घंटा

मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, लिव्हर सिरोसिस यांसारख्या गंभीर आजारांना मिळते निमंत्रण

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : अलीकडे मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढताना दिसत असले, तरी त्याहीपेक्षा अधिक धोकादायक बाब म्हणजे त्यांच्या यकृतामध्ये साठणारी चरबी. इस्रायलमधील संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, लहान वयातच यकृतात (लिव्हर) चरबी साठण्याचे प्रमाण वाढल्यास पुढे जाऊन टाईप-2 मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि लिव्हर सिरोसिससारखे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

संशोधनात लठ्ठपणाने ग्रस्त 31 मुलांची तपासणी करण्यात आली. आजारांची लक्षणे असलेल्या मुलांच्या यकृतात सरासरी 14 टक्के चरबी आढळून आली, तर आरोग्यद़ृष्ट्या निरोगी असलेल्या मुलांमध्ये ती केवळ 6 टक्के होती. विशेष म्हणजे, दोन्ही गटांतील मुलांमध्ये आंतरिक चरबी (विसरल फॅट) किंवा वजन यामध्ये फारसा फरक नव्हता; मात्र यकृतातील चरबीचे प्रमाण वेगळे होते. ही तपासणी एमआरआय स्कॅनसारख्या वेदनारहित पद्धतीने करण्यात आली.

आहारातील गुणवत्तेत बदल आवश्यक

आजच्या युगात लहान वयात दिसणारी यकृतातील चरबी ही भविष्यातील गंभीर आरोग्य संकटांचे दार उघडत आहे. याकडे दुर्लक्ष न करता आहार आणि जीवनशैलीमध्ये वेळेत बदल केल्यास ही स्थिती टाळता येऊ शकते. या संशोधनातून हेही समोर आले आहे की, केवळ वजन कमी करणे पुरेसे नाही, तर आहारातील गुणवत्तेत बदल करणे अत्यावश्यक आहे. आजारांची लक्षणे दिसलेल्या मुलांच्या आहारामध्ये सोडियम, प्रोसेस्ड फूड आणि संतृप्त चरबी यांचे प्रमाण अधिक असल्याचेही संशोधनातून समोर आले आहे.

शहरी भागांतील मुलांना धोका अधिक

अलीकडच्या काळात शहरी भागांतील लहान मुलांमध्ये जंक फूडचे प्रमाण वाढले. त्याचबरोबर शारीरिक हालचालींचा अभावही यामागे कारणीभूत ठरतो. यामुळे भविष्यात या मुलांना कमी वयातच जीवनशैलीजन्य आजारांना सामोरे जावे लागू शकते.

पालकांनी घ्यावी जबाबदारी

पालकांनी आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. टिफिनमध्ये बिस्किटस्, वेफर्सऐवजी फळं, डाळींचे पराठे, सुका मेवा हे पर्याय अधिक उपयुक्त ठरू शकतात. तसेच दर काही महिन्यांनी आरोग्य तपासणी करून यकृताचे आरोग्य कसे आहे, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज गंभीर

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ ही सध्या मुलांमध्ये वाढणारी गंभीर समस्या ठरत आहे. ही स्थिती सुरुवातीस लक्षणांविना असली, तरी हळूहळू ती शरीरातील इतर अवयवांवर परिणाम करू लागते. तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या आहारात फळं, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, मासे, ऑलिव्ह तेल आणि सुका मेवा यांचा समावेश केल्यास यकृताचे आरोग्य टिकवता येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT